महाळुंगे येथील खून प्रकरणातील आरोपीस मध्यप्रदेशातून अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई
महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे ( पुणे ) : महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथे एकमेकांचे मोबाईल फोडल्याच्या रागातून २३ वर्षीय तरुणाचा फेट्याने गळा आवळून व डोक्यात लोखंडी तवा
घालून निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या युनिट तीनच्या पोलीस पथकाने ( दि. २ ) मध्यप्रदेशातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी दिली. ही घटना
२८ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महाळुंगे
येथे ऋषिकेश शिवळे यांचे रूममध्ये घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामसिंग सुलतानसिंग गोंड ( वय ३०, रा. रेयाना, ता. जि. दमोह, मध्यप्रदेश ) याने मोबाईल फोडल्याच्या रागातून झालेल्या भांडणात त्याचे खोलीत राहणारा कालू मंगल रकेवार
( वय २३, सध्या रा. ऋषिकेश शिवळे यांची खोली, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. पथरीया, ता. जि. दमोह, मध्यप्रदेश ) याचा खून करून गावी पळून गेला होता. तांत्रिक तपासात पोलिसांना यश मिळत नव्हते अशातच राज्य व आंतरराज्य बातमीदारांकडून पोलिसांनी आरोपीच्या ठावठिकाण्याची गोपनीय माहिती घेतली. येथील युनिट तीनच्या पोलीस पथकाने पारंपरिक पद्धतीने कौशल्यपूर्ण तपास लावून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन शेतातून पळून जात असताना पाठलाग करून शिताफीने आरोपीला जेरबंद केले.
याबाबत कालूचा भाऊ पप्पू मंगल रकेवार ( वय ४०, सध्या रा. ऋषिकेश शिवळे यांची खोली, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. पथरीया, ता. जि. दमूही, मध्यप्रदेश ) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त, विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, महेश भालचिम यांनी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष कसबे हे पुढील तपास करीत आहेत.