इतर शहरातून पुण्यामार्गे दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल
पुणे, दि. २२: पुणे शहरातून सोलापूर रस्ता, अहमदनगर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई रस्ता, नाशिक रस्ता, सासवड रस्ता, पौड रस्ता, आळंदी रस्ता व इतर रस्त्यांवरून शहरात मार्गक्रमण करून दुसऱ्या शहराकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड, अवजड माल वाहतूक करणारे ट्रक व इतर वाहनांनी येताना व जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास २३ मार्च पासून पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे. यासंबंधीचे पूर्वीचे आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी जारी केले आहेत.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये झालेली वाढ, वाहतूक कोंडी, जड वाहनांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तसेच मेट्रो, उड्डाणपूल आदी विविध मोठे प्रकल्प व विकास कामे सुरु असल्यामुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना मोठा धोका व गैरसोय असल्याने ती टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले व रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत प्रवेश असणारे मार्ग
अहमदनगर रस्त्यावरून पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पुल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग बंद राहील. वाहनचालक शिक्रापूर, चाकण, तळेगाव या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील. अहमदनगर रस्त्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी वायपास चौक, मगरपट्टा रोड, सासवड रोडने मंतरवाडी फाटा चौक, खडी मशीन चौक, कात्रज चौक मार्ग बंद राहील. वाहनचालक लोणीकंद, केसनंद, थेऊर, थेऊर फाटा तसेच शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजूरी या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील.
अहमदनगर रस्त्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरिता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग बंद राहील. वाहनचालक शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला मार्गे इच्छितस्थळी जातील. सोलापूर रस्त्यावरून साताराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मंतरवाडी फाटाचौक, खडी मशीनचौक, कात्रजचौक मार्ग बंद राहील. वाहनचालकांनी केडगाव चौफुला, लोणंद या पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे.
सोलापूर रस्त्यावरून अहमदनगर व नाशिककडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मगरपट्टा रोड, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेव आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पुल मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांनी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापुर मार्गे तसेच केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूर मार्गे इच्छितस्थळी जावे.
शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड, अवजड वाहनांसाठी २४ तास प्रवेश बंद
पुणे शहरातील मंगलदास रस्त्यावरील ब्ल्यु डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक, रेंजहिल्स् रोडवरील पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स कॉर्नर चौक, सर मानेकजी मेहता रोडवरील काहुन रोड जंक्शन ते कौन्सिल हॉल चौक, पुणे स्टेशन रोडवरील जहांगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक या अंतर्गत रस्त्यावर जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर २४ तास प्रवेश बंद राहील. सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने यातून वगळण्यात आली आहेत.
सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले चौक
संचेती चौकावरील जंगली महाराज रोड, गणेशखिंड रोड, पौड फाटा चौकवर कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोड, राजाराम पुलावरून डी. पी. रोडकडे जाणारी, दांडेकर पुल-शास्त्री रोडकडे, सावरकर पुतळा चौक बाजीराव रोडकडे, पॉवर हाऊस चौक-मालधक्का चौकाकडे, पोल्ट्री फार्मचौक-आर.टी.ओ. चौकाकडे, पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे, खाणे मारूती चौक-इस्ट स्ट्रीटकडे, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे, ब्रेमेन चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री बाणेर चौक पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री पाषाण चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, सिंफनी सर्कल गणेशखिंड रोडकडे, सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे, आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, वल्फर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.
सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कोरेगाव पार्क रोड-नॉर्थ मेन रोड ताडीगुत्ता चौक ते कोरेगाव पार्क जंक्शन या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद असेल.
अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असेही पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.