Saturday, August 30, 2025
Latest:
निवडणूकप्रशासकीय

लोकसभा निवडणुका निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे :
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका निकोप वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, निवडणुकांच्यादृष्टीने प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रीयेच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांना माहिती देण्यात येत आहे. ईव्हीएम सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच स्थिर आणि भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली असून ईएसएमएस ॲपवर होणाऱ्या कारवाईची माहिती भरण्यात येणार आहे.

बँकेतून होणाऱ्या मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती घेतली जाणार आहे. पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास किंवा खाजगी जागेत परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई करण्यात येईल. राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेबाबत दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रीया पारदर्शक राहील यावर भर देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात शांततेच्या वातावरणात निवडणुका होण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि मुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!