तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता दुरुस्तीसाठी नागरिक आक्रमक होऊन उतरले रस्त्यावर, खड्ड्यात झाड लावून नोंदविला निषेध तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी पक्क्या रस्त्याची मागणी,
तळेगाव–चाकण–शिक्रापूर रस्ता दुरुस्तीसाठी नागरिक आक्रमक होऊन उतरले रस्त्यावर, खड्ड्यात झाड लावून नोंदविला निषेध
तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी पक्क्या रस्त्याची मागणी,
अतिक्रमणांमुळे नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे,
राज्यमार्ग महामार्गाकडे वर्ग केल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग करते केवळ डागडुजी
महाबुलेटीन न्यूज चाकण : तळेगाव–चाकण–शिक्रापूर रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे व रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनीचाकण (ता.खेड) येथे प्रशासनाच्या कुचकामी कामाच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांकडून आक्रमक पवित्रा घेत तळेगाव रस्त्यावरउतरून हातात जाहीर निषेधाचे फलक फलक घेऊन तीव्र आंदोलन छेडले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनानागरिकांनी पक्के धारेवर धरले.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर रस्ता हा पुणे–मुंबई, पुणे–नाशिक, पुणे–अहमदनगर प्रमुख महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. तसेच चाकण एमआयडीसीमधील महत्वाचा मार्ग असून याच रस्त्यावरून चाकणसह रांजणगाव व औरंगाबाद एमआयडीसीतीलकारखान्यांची अवजड वाहतूक होत असते.
हा मार्ग पहिला राज्यमार्ग ५५ होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी म्हणून घोषित करण्यात आला. चालू वर्षी जानेवारी महिन्यात चाकण–तळेगाव रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे हटविण्यात आली होती. तेव्हा नागरिकांना अपेक्षा होती की, आता तरी हा रस्ता मोठा होईल. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे आणि वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल. पण सध्या या रस्त्याची परिस्थिती पहिल्या पेक्षाही बिकट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तात्पुरत्या स्वरुपाचा मुरूम टाकून मलमपट्टी करते. नंतर रस्त्याची अवस्था परत जैसे थे होते. असा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. आम्हाला कायम स्वरुपी पक्का रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी लावून धरली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल कदम यांना रस्ता दुरुस्तीचे निवेदन देण्यात आले.
चाकण–तळेगाव रस्त्यावरील तळेगाव चौक, नाणेकरवाडी, राणुबाईमळा, खराबवाडी, महाळूंगे इंगळे, खालुंब्रे आणि चाकण–शिक्रापूर रस्त्यावरील मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, भोसे या गावातील रस्त्याची अवस्था फार दयनीय झाली आहे. रस्त्यात जागोजागी दोन–दोन फुटाचे खड्डे पडले असून खराबवाडी व महाळुंगे येथील ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाले आहेत. त्यांना भेगा पडल्या असून पुलावर रस्ता खचला आहे.
मागील काही दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने व नैसर्गिक स्रोत अतिक्रमणामुळे बंद झाल्याने रस्त्यांवरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले जाते. पाणी साचलेल्या खड्ड्यातून मार्ग शोधताना वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत.
चाकणला एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र असल्याने ह्या रस्त्याने दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने, टेम्पो, ट्रक, बसेस, ट्रेलर व कंटेनरसारखी अवजड वाहने हजारोच्या संख्येने दररोज वाहतूक करीत असतात. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनांचे किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान, तसेच नागरिकांना किरकोळ व गंभीर दुखापती होतात. खड्डे एवढे मोठे आहेत की, त्या खड्ड्यामध्ये बस, टेम्पो, ट्रक, ट्रेलर ही वाहने अडकून पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा मनस्ताप वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दररोजच्या होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे अखेर स्थानिक नागरिकांचा सहनशक्तीचा बांध फुटला. प्रशासनाच्या ढिम्म कारभाराला कंटाळून अखेर आक्रमक पवित्रा घेत स्थानिक नागरिकांनी जाहीर निषेध नोंदवत चाकण-तळेगाव रस्त्यावर आंदोलन केले. नागरिकांकडून निषेधाचे बॅनर झळकावित घोषणा देण्यात आल्या. खड्ड्यामध्ये झाडे लावून निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनाला चाकण परिसराच्या गावातील नागरिक उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी भाजप नेत्या व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक क्रांती सोमवंशी, शिवसेना जिल्हा संघटक राहुल गोरे, ग्राहकसंरक्षण समितीचे लक्ष्मण जाधव, भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, खराबवाडीचे माजी उपसरपंच रवींद्र धाडगे, नाणेकरवाडीचे माजी सरपंच सुनील नाणेकर, माजी उपसरपंच बाबू नाणेकर, माजी उपसरपंच महेश जाधव, ग्रा. पं. सदस्य गणेशनाणेकर, ग्रा. पं. सदस्य नितीन नाणेकर, श्रीकांत कड, शरद लेंडघर, किरण कड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शाळेत जाणाऱ्या मुलांना वाहतूककोंडीत बसमध्येच एक ते दोन तास उपाशी पोटी बसावे लागते. घरातील व्यक्तीला दवाखान्यातघेऊन जायचे झाले तर दोन किलोमीटरच्या अंतर जाण्यासाठी एक तास वेळ लागतो. इतकी वाईट ह्या रस्त्याची परिस्थिती आहे. –शरद लेंडघर, स्थानिक नागरिक
तळेगाव–चाकण–शिक्रापूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आल्याने सर्व मालकी हक्क त्यांच्याकडे आहे. सार्वजनिकबांधकाम विभाग फक्त रस्ता देखभाल दुरुस्तीचे काम पाहते. त्यामुळे आम्ही फक्त खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करून देऊ शकतो. तळेगाव ते शिक्रापूर रस्त्याच्या कडेने कुठे ही ड्रेनेज लाईन नसल्याने पाणी रस्त्यावर साचून राहते. त्यामुळे खड्डे पडतात. तसेचआर्थिकदृष्ट्या मोठी असणारी कामे म्हणजे ड्रेनेज लाईन, रस्ता उचलून घेणे ही कामे परवानगी मिळाल्याशिवाय आम्हाला करतायेत नाही. –राहुल कदम, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर या मार्गाच्या कामात जो अडथळा निर्माण करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. –वर्षाराणी पाटील, पोलिस निरीक्षक, चाकण
ह्या मार्गावर इतके मोठे खड्डे आहेत की, वाहन कसे चालवावे असा प्रश्न पडतो. रस्त्याची डागडुजी करण्याचे काम संबंधितविभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे. त्यांनी त्यांचे काम जबाबदारीने करावे. –क्रांती सोमवंशी, भाजप नेत्या, संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती, खेड 0000