चाकणला घरगुती गॅसच्या स्फोटात एक जेष्ठ महिला ठार, आठजण जखमी, एक तरुण गंभीर भाजला
चाकणला घरगुती गॅसच्या स्फोटात एक जेष्ठ महिला ठार, आठजण जखमी, एक तरुण गंभीर भाजला
महाबुलेटीन न्यूज l चाकण
चाकण येथील राणूबाईमळ्यात घरगुती गॅसचा स्फोट होऊन एक जेष्ठ महिला ठार झाली असून घरातील सदस्यांसह अन्य आठजण जखमी झाले आहेत. घरमालकाचा नातू अक्षय सुरेश बिरदवडे हा 90 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना बुधवार ( दि. 21 डिसेंबर ) रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. या घटनेत शेजारील घरावर भिंत पडून चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे ( वय 75 ) ह्याजेष्ठ महिला भिंतीखाली अडकल्याने जागीच मयत झाल्या.
स्फोट होताच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच भिंती खाली कोसळून पडल्या. सिलेंडरचे तुकडे झाले. घटनास्थळापासून अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत प्रचंड मोठा आवाज होऊन इमारतींना हादरा बसल्याचे नागरिकांनी सांगितले. दोन भिंती शेजारच्या घरांवर पडल्या तर एक महिला पहिल्या मजल्यावरून भिंतीसोबत खाली पडली.
या घटनेत वैष्णवी सुरेश बिरदवडे ( वय 20 ),अक्षय सुरेश बिरदवडे ( वय 18 ), गीताबाई सुरेश बिरदवडे ( वय 40 ), लक्ष्मीबाई परशुराम बिरदवडे ( वय 78 ), अंजना प्रभाकर केळकर ( वय 75 ) व 3 अनोळखी भाडेकरू ( 2 महिला 1 पुरुष ) असे आठजण जखमी झाले आहेत.
दरम्यान घटना घडताच माजी सरपंच दत्तात्रय बिरदवडे, तुकाराम परशुराम बिरदवडे, संतोष विठोबा बिरदवडे, अक्षय जंबुकर, सुधाकर जंबुकर, आकाश लेंडघर, रविंद्र बिरदवडे, माऊली बिरदवडे, अक्षय बिरदवडे, संदिप बिरदवडे, स्वप्नील बिरदवडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाचविण्यासाठी मदत कार्य केले. पुणे जिल्हा शिवसेना संघटक राहुल गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
0000