चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यातील अनाधिकृत बांधकाम अखेर पुरातत्व विभागाने पोलीस बंदोबस्तात हटविले
चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यातील अनाधिकृत बांधकाम अखेर पुरातत्व विभागाने पोलीस बंदोबस्तात हटविले
महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्यामधील अनधिकृत व बेकायदेशीर अतिक्रमण अखेर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने हटविले.
चाकण येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये मुस्लीम धर्मियांची मस्जिद असून या सभोवताली मोठ्या स्वरूपाचे बेकायदेशीर पत्र्याचे शेडचे अतिक्रमण करून उभारण्यात आले होते. ही बाब इथून मागील काळात चाकण येथील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण झिंजुरके यांनी पुरातत्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. ‘चाकण येथीलसंग्रामदुर्ग या ऐतिहासिक किल्ल्याची जागा बेकायदेशीरपणे बळकवली जात असून पुरातत्त्व विभागाने सदर बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे,’ अशी मागणी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली होती.
अनाधिकृत पत्राशेडमुळे ऐतिहासिक किल्ल्याला बाधा पोहोचत असल्याने पुरातत्व विभागाने संबंधितांना स्वतः अतिक्रमण काढण्यासाठी चार वेळा नोटीस बजावली, परंतु संबंधितांकडून अतिक्रमण काढण्यासाठी चक्क टाळाटाळ केली जात होती. अखेर पुरातत्व विभागाने चाकण नगरपरिषद प्रशासन तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पोलीस दलाच्या उपस्थितीत सदर बेकायदेशीर अतिक्रमण हटविले.
यावेळी पुरातत्त्व विभागाचे हेमंत गोसावी, बाळासाहेब दौंडकर, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, चाकण नगर परिषदेचे मुख्यधिकारी सुनील बल्लाळ, उपमुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. किरण झिंजुरके, राहुल वाडेकर, शैलेश कड, अनंत देशमुख, सचिन आल्हाट, योगेश साखरे व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0000