१७ ऑगस्ट : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेला ३५५ वर्षे पूर्ण… पुणे जिल्ह्यातील ३० मावळे आग्ऱ्याहून शिवज्योत घेऊन राजगडाकडे निघाले…२९ ऑगस्ट ला पोहोचणार राजगडावर..
१७ ऑगस्ट : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेला ३५५ वर्षे पूर्ण… पुणे जिल्ह्यातील ३० मावळे आग्ऱ्याहून शिवज्योत घेऊन राजगडाकडे निघाले…२९ ऑगस्ट ला पोहोचणार राजगडावर..
महाबुलेटीन न्यूज
मुळशी : मोगलांच्या नजरकैदेतून सुटून आग्र्याहून थेट राजगडावर पोहोचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गरुडझेपेला ३५५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील ३० मावळे गरुडझेप मोहिमेअंतर्गत आग्रा येथील लालकिल्ल्यापासून राजगडपर्यंत शिवज्योत आणणार असून यामध्ये मुळशी, मावळ, हवेली, दौंड या तालुक्यातील मावळ्यांचा सहभाग असणार आहे.
प्रसिद्ध शिवप्रेमी व गिर्यारोहक ॲड. मारुती (आबा) गोळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या मोहीमेत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, शिवभूमी भ्रमंती ग्रुप कोंढवे – धावडे, गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था, वडगाव मावळ, डब्ल्यूजीआरएफ टीम, पुणे अशा विविध संघटनांचे ३० मावळे सहभागी झाले आहेत.
हे मावळे आग्रा ते राजगड हे १२०० किलोमीटर अंतर १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२१ या १२ दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा चार राज्यांतून ५८ शहरातून १३ दिवस रोज १०० किलोमीटर धावत पूर्ण करून ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोखा प्रयत्न पूर्ण करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या नजरकैदेतून अत्यंत चाणाक्ष बुद्धीने निसटून गरुडझेप घेऊन राजगडावर सुखरूप पोहोचलेल्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत असून ही हिंदवी स्वराज्याच्या दिशेने छत्रपती शिवरायांनी घेतलेली एक गरूडझेप होती. १५० वर्षे हिंदुस्थानावर राज्य करत असलेल्या ब्रिटीशांना हद्दपार करण्याचे काम भारतीयांनी १९४७ साली केले, त्यांच्या या संघर्षामागे छत्रपती शिवरायांच्या झुंजार लढ्याची प्रेरणा होती. हीच प्रेरणा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, हवेली, दौंड या भागांतील तीस मावळे एक गरूडझेप घ्यायला सज्ज झाले आहेत. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचे स्मरण करणे आणि सध्याच्या निराश वातावरणात तरुणाईसमोर एका साहसी मोहिमेचे उदाहरण ठेवणे, हा या मोहिमेचा मूळ उद्देश असल्याचे गोळे यांनी सांगितले.
या गरुडझेप मोहिमेचे प्रमुख मारुती आबा गोळे व सहभागी होणाऱ्या मावळ तालुक्यातील गणेश जाधव, नितीन चव्हाण, श्रीनिवास कुलकर्णी, अंकेश ढोरे, रवींद्र विनोदे, हनुमंत जांभूळकर, अशोक सरपाटील, सुमित लिंबोरे, नितीन चव्हाण, विशाल शिंदे, अतुल ढोरे या मावळ्यांना आमदार सुनिल शेळके, नगराध्यक्ष मयूर ढोरे व तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी फर्जंद व फत्तेशिकस्त चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, लेखक सौरभ करडे, शिवव्याख्याते रवींद्र यादव, अंकुश आंबेकर, संतोष कडु उपस्थित होते.
००००