७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ… पुणे येथे ४००० वृक्षांची लागवड ‘वृक्षाची छाया, वृद्धांची माया’ – सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संत निरंकारी मिशन द्वारे
वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ… पुणे येथे ४००० वृक्षांची लागवड
‘वृक्षाची छाया, वृद्धांची माया’
– सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
महाबुलेटीन न्यूज
पुणे ( दि. २२ ऑगस्ट ) : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ‘Oneness-Vann’ (वननेस-वन) नामक या परियोजनेचा निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या शुभहस्ते २१ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आला. संपूर्ण भारतातील २२ राज्यांच्या २८० शहरांमध्ये निवडक ३५० ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे १,५०,००० रोपांची लागवड करण्यात आली. येत्या काळात या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या महाभियानाअंतर्गत संत निरंकारी मिशनच्या सेवादार व भाविक-भक्तगणांची महत्वपूर्ण भूमिका असेल. या मोहिमेमध्ये संत निरंकारी मिशन व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, शैक्षणिक संस्था व आर.डब्ल्यू.ए. इत्यादीमधील लोक सहभागी होतील.
या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील नानगाव ब्रँच मधील खुटबाव, लोणावळा ब्रँच मधील कामशेत आणि भोसरी येथील दत्तगड दिघी येथे ४००० इतकी झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षारोपण करण्यासाठी मिशनचे श्री.ताराचंद करमचंदानी (पुणे झोनचे क्षेत्रीय प्रभारी) सह सेवादलचे क्षेत्रीय संचालक, संयोजक तसेच स्थानिक प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे स्थानिक अधिकारी व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम करुन वृक्षारोपणाचे कार्य पार पाडले.
या अभियानाचा प्रारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज म्हणाल्या, “प्राणवायु, जो आम्हाला या वृक्षांपासून प्राप्त होत असतो त्याचे धरतीवर संतुलन ठेवण्यासाठी वनांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेवढे अधिक वृक्ष लावू तेवढीच अधिक ऑक्सिजनची निर्मिती होईल आणि तेवढीच शुद्ध हवाही प्राप्त होईल.”
तसेच सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी World Senior Citizen’s Day चा उल्लेख करुन सांगितले की ‘वृक्षांची छाया, वृद्धांची माया’ या उक्तीप्रमाणे जसे ज्येष्ठाचे आशीर्वाद आमच्यासाठी आवश्यक आहेत तद्वत वृक्ष देखील आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. ज्याप्रमाणे ‘वननेस-वन’ चे स्वरूप अनेकतेत एकतेचे दृश्य प्रस्तुत करते तद्वत मानवानेही समस्त विसरुन शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने एकोप्याने राहून जगाचे सौंदर्य वाढवण्याची गरज आहे.
‘वननेस-वन’ नामक या परियोजने अंतर्गत संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षांचे समूह (Tree Clusters) लावण्यात येतील. त्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रभावाने आजुबाजूचे वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचू शकेल आणि स्थानिक तापमान सुद्धा नियंत्रणात राहील. हे वृक्ष स्थानिक जलीवायु आणि भौगोलिक परिस्थितीनुसारच लावण्यात येणार आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील. त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.
आज जेव्हा आमची धरती ग्लोबल वॉर्मिंग च्या समस्येचा सामना करत आहे, अशा समयी वृक्षारोपणाचे महत्व आणखी अधिक वाढलेले आहे. हे सर्व विदित आहे की, ‘संत निरंकारी मिशन’ हे एक विश्वस्तरीय आध्यात्मिक व्यासपीठ आहे जे सर्वांभूती निराकार ईश्वराची अनुभूती बाळगून प्रेम, सहिष्णुता व सद्भावपूर्ण एकत्वाच्या विचारधारेमध्ये विश्वास बाळगते. मिशनमार्फत पर्यावरण सुरक्षेसाठी सातत्याने कार्य करण्यात येत आहे. वेळोवेळी देशभर वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, जल संरक्षण, घनकचरा प्रबंधन (Waste Management) आणि प्लास्टिकचा उपयोग न करणे यांसारख्या अभियानांमध्ये पुढाकार घेत आले आहे.
मिशन आणि ‘गिव्ह मी ट्री ट्रस्ट’ च्या सहयोगात्मक प्रयत्नांतून साकार होत असलेला हा उपक्रम राष्ट्राला ‘पर्यावरण संरक्षणाच्या’ हेतुने एक नवे परिमाण स्थापन करण्यामध्ये मदत करील.
००००