७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम – ५, ६, ७ डिसेंबरला व्हर्च्युअल रुपात
‘स्थिरता’ – वर्तमान जगाची परम आवश्यकता
मन निरंकार प्रभुशी जोडल्याने जीवनात येईल ‘स्थिरता’ : सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, १९ नोव्हेंबर,२०२० : निरंकारी ‘सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या आशीर्वादाने या वर्षीचा ७३वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात दिनांक ५,६, ७ डिसेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे. वैश्विक महामारी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारत सरकारने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन हा संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत आहे. जगभरातील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत.
निरंकारी मिशनच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे, की वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला जात आहे. ही शुभ सूचना मिळाल्याने समस्त निरंकारी जगतामध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हर्च्युअल रुपातील या संपूर्ण समागमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण संत निरंकारी मिशनच्या वेबसाईट वर दिनांक ५, ६, ७ डिसेंबर, २०२० रोजी केले जाणार आहे. या व्यतिरिक्त हा समागम संस्कार टी.व्ही. चॅनल वर तिन्ही दिवशी सायंकाळी ५:३० ते रात्री ९:०० या वेळात प्रसारित करण्यात येईल.
‘संत निरंकारी मिशन’ समाज सेवच्या कार्यामध्ये सदोदित अग्रगण्य राहिलेले आहे आणि त्याबद्दल प्रशंसेलाही पात्र बनलेले आहे. मिशनचे सर्व सामाजिक उपक्रम नियमितपणे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून जनकल्याणासाठी राबविले जात आहेत. त्यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान यांच्या व्यतिरिक्त भूकंप, महापूर, सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीने पीड़ित आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी मिशनकडून भरपूर योगदान दिले जात आहे.
कोविड-१९ च्या वैश्विक महामारीच्या काळात संत निरंकारी मिशनने सरकारकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवणे व मास्कचा वापर करणे (मास्क वापरा निरंतर, ठेवा सामाजिक अंतर) समाजकल्याणाचे अनेक उपक्रम पुणे जिल्ह्यामध्ये राबवले. यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजुंना जिवनावश्यक वस्तुंचे (रेशन) वाटप, निरंकारी सत्संग भवन क्वारंटाईन सेन्टर म्हणून प्रदान करणे इत्यादी विविध सेवांचा समावेश आहे. मिशनच्या वतीने प्रवासी शरणार्थी लोकांसाठी Shelter Homes (तात्पुरता निवारा) तयार करुन त्यामध्ये त्यांच्या राहण्याची तसेच चहापानाची उचित व्यवस्था करण्यात आली. याशिवाय संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन मास्क तसेच सॅनिटायझरचे वितरण केले. या सेवा सातत्याने सुरु आहेत.
देश-विदेशातील निरंकारी भक्तगण या व्हर्च्युअल समागमाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत.