Sunday, April 20, 2025
Latest:
कोरोनापुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

धक्कादायक : गेल्या २४ तासात राज्यात चार पत्रकारांचे निधन

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राला हादरून टाकणाऱ्या आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणाऱ्या बातम्या सातत्यानं येत आहेत. संतोष पवार यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजून माध्यम क्षेत्र सावरलेले नसतानाच गेल्या २४ तासात राज्यात ४ पत्रकारांचे निधन झाल्याची बातमी असून राज्यातील अनेक पत्रकार कोरोनाशी लढा देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माध्यमात चिंतेचे वातावरण आहे.

पत्रकारांना बातम्यांसाठी सातत्यानं बाहेर पडावे लागत असल्याने बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा योग्य आणि वेळेत उपचार मिळाले नाही तर पत्रकारावर मृत्यूची वेळ येते हे संतोष पवार आणि पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूमुळे समोर आले आहे.

नागपूर येथील लोकशाही वार्ताचे पत्रकार नितीन पातघरे यांच्याबाबतीत देखील निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले असून सरकारी अनास्थेनं त्यांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते.
नागपूर मेट्रो समाचार व इन बीसीएन न्यूज चॅनेलचे वाडी येथील पत्रकार सुनील शेट्टी याचंही काल कोरोनानं निधन झालं. नागपूर येथीलच आणखी एक पत्रकार सागर जाधव देखील आपणास सोडून गेले आहेत.

ठाणे येथील ठाणे टाइम्सचे संपादक आणि मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ठाणे शहर पत्रकार संघाचे सहसचिव प्रशांत कांबली यांचं आज निधन झालं. अस्वस्थ वाटू लागलयानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोरोना किंवा कोरोना सदृश्य आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. यातील बहुतेक जण पन्नासच्या आसपासच्या वयोगटातील होते. यापैकी सरकारने किंवा हे पत्रकार ज्या माध्यम समुहासाठी काम करीत होते. त्यांनी कोणालाही कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पत्रकारांनी आपली काळजी घ्यावी, शक्यतो बाहेर पडणे टाळावे, मास्क तसेच सोशल डिस्टस्टिंगचे पालन करावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!