छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तीन दिवस फूड फेस्टिव्हल व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण एमआयडीसी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त चाकण एमआयडीसीत १८, १९ व २० जून असे तीन दिवस विविध प्रांतांचे, भाषांचे व विविध राज्यांचे फूड फेस्टिवल, कल्चरल प्रोग्रॅम अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय चालणाऱ्या या कार्यक्रम सोहळ्याचे समापन २० जून रोजी भव्य स्वरूपात करण्याचे ठरले. चाकण एमआयडीसीतील बजाज ऑटो येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी परिसरातील २४ गावांचे सरपंच, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, मालक व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे अध्यक्ष शिवहरी हालन, सचिव दिलीप बटवाल, भारत भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे व महाराष्ट्र प्रदेश सचिव धर्मेंद्र सिंह उपस्थित होते.
चाकण औद्योगिक परिसर हा जगभरात डेट्रॉईड ऑफ एशिया या नावाने प्रसिद्ध झाला आहे. चाकण मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नामांकित ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आपापले काम करत आहेत. या उद्योगांमध्ये काम करण्यासाठी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळे आहार करत असलेले, वेगवेगळे संस्कृती असलेले लोक काम करत आहेत. त्यामुळे चाकण परिसर मिनी भारत म्हणूनही नवीन ओळख निर्माण करत आहे. भारतात अनेक प्रांतामधून, भाषांमधून, आहार विहार विचारांमधून एकता प्रदर्शित होत असते. चाकणमध्ये कंपन्यांमध्ये काम करत असताना सर्वजण एक असतात. परंतु काम संपवून कंपनी बाहेर पडल्यानंतर मात्र प्रांतांच्या, भाषेच्या, आचार विचारांच्या संस्कृतीच्या, आहाराच्या सवयीच्या भिंती उभ्या राहतात व त्यामुळे बंधुभाव निर्माण होण्यास अडचण होते, सौहार्द निर्माण होण्यास अडचण होते आणि हे या परिसराच्या विकासासाठी घातक आहे. त्यावर उपाय करण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने भारत भारती या संस्थेबरोबर या भिंती तोडण्यासाठी व एकोपा निर्माण करण्यासाठी, बंधुभाव निर्माण करण्यासाठी, प्रेम निर्माण करण्यासाठी चाकणमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.
निघोजे गावच्या सरपंच सुनीता येळवंडे यांनी सुरेख समापन करून सोहळ्याला सर्व प्रकारे सहाय्य करण्याची भावना प्रकट केली. यावेळी मंचावर फेडरेशनचे एडिटर मुकुंद पुराणीक व संजय परळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी स्थापन केलेल्या संयोजक समितीचे प्रमुख एस. एम. सिंग, तर अभय चौधरी, अंजनी पांडे, किरण अस्तगावकर, नितीन भागवत, कैलास येळवंडे, विजया देशपांडे हे संयोजन समिती सदस्य असतील. कोहिनूर उद्योग समूहाचे कृष्ण कुमार गोयल यांनी आपली चाकण मधील जागा या कार्यक्रमाच्या ऑफिससाठी वापरण्यास दिली आहे.
विविध कंपन्या व चाकण मधील गावे यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक कार्यक्रम करीत आहेत, ही अत्यंत अभूतपूर्व घटना आहे. अशी सर्वांची प्रतिक्रिया होती. या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सेक्रेटरी दिलीप बटवाल व बजाज ऑटोचे अमित गंभीर यांनी विशेष परिश्रम घेतले. अभय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.