इंदापूर : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष हाजी एम. डी. शेख यांना राज्यपाल नियुक्त पत्रकार प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, अश्या मागणीचा ठराव परिषदेचे सरचिटणीस अरुणकुमार मुंदडा यांनी मांडला आहे. हाजी एम. डी. शेख यांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची आज ( दि.१८ जुलै ) झूम ॲपच्या माध्यमातून बैठक झाली.
या बैठकीत मुंदडा यांनी हा ठराव मांडला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हाजी एम. डी. शेख हे सुमारे चार हजार पत्रकारांचे नेतृत्व करत आहेेत. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी एका जागेवर पत्रकार प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी, असे या ठरावात म्हटले आहे. परिषदेचे कोषाध्यक्ष वाय. ए. सिद्दीकी, कार्यकारिणी सदस्य डॉ. संदेश शहा यांनी ठरावास अनुमोदन दिले.
शेख यांची नियुक्ती होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना परिषदेच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात इंदापूरमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारले होते. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी करण्यात आली. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस मुंदडा यांनी दिली.