राजकीय किस्से : याला म्हणतात कार्यकर्त्यांना ताकद देणं….
महाबुलेटिन नेटवर्क | शिवाजी आतकरी
अनेक नेते आपल्या वागण्या बोलण्यातून आपली छाप सोडतात. असे नेते खऱ्या अर्थाने लोकनेते ठरतात. लोकनेता ही पदवी त्यांच्या नावासोबत जोडली जाते ती त्यांच्या माणसे जपण्याच्या कृतीमुळेच.
खेड तालुक्याच्या राजकारणावर ऍड शांतारामबापू गारगोटे यांनी अशीच आपली छाप सोडली. त्यांच्या हयातीत त्यांना वगळून तालुक्याची राजकीय गणिते मांडणे अशक्य होते. काँग्रेस संस्कृतीच्या मुशीत तयार झालेले शांताराम गारगोटे यांनी त्यांच्या राक्कीय कारकिर्दीत अनेक मोठ्या नेत्यांचे पैलू जवळून पाहिले. त्यांनी सांगितलेला एक किस्सा आजही आठवतोय.
बापूंनी राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला. कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची, कार्यकर्त्यांची किंमत, वजन कसे वाढवायची हे काही नेत्यांना पक्के माहीत होते. पूर्वी मोबाईल सोडा, टेलिफोनही कार्यकर्ते, तालुका पातळीवरील अनेक नेय्यांकडे नव्हते. बरीच वर्षे झाली. एकदा प्रांत कार्यालयातील शिपाई माझ्याकडे घरी घाईने आला. थोपटेसाहेबांचा फोन आला होता प्रांतसाहेबांना. आपणास तातडीने ऑफिसमध्ये बोलावलंय साहेबांनी.
यानंतर बापू कार्यालयात गेले वगैरे सर्व ओघाने आले.
या घटनेबाबत अधिक सांगताना बापू म्हणाले होते, आपले कार्यकर्ते गरीब आहेत. शासकीय कार्यालयात ते जनतेची कामे घेऊन जातात. अनेक अधिकारी त्यांना दाद देत नाहीत. अशा कार्यकर्त्यांची किंमत होते. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही नेतेमंडळी अशापद्धतीने फोन करत. थेट मंत्री फोन करतो, कार्यकर्ते, तालुक्यातील नेत्यांशी बोलतो, चौकशी करतो, याचा अर्थ अधिकारी समजून जातो. कार्यकर्त्यांचे बळ वाढते. अनंतराव थोपटे हे लोकनेते अशापद्धतीने कार्यकर्त्यांना जपत. त्यांची बुज ठेवत. थोपटेसाहेब व त्यांच्या पिढीतील मंडळींनी कार्यकर्ते असे सक्षम करून पक्ष बळकटी साधली होती. असेच त्यांचे अनेक किस्सेही स्व बापूंनी सांगितल्याचे आठवते.