इंदापूर तालुक्यात तूर्तास लाॅकडाऊनची गरज नाही : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
महाबुलेटीन नेटवर्क : शैलेश काटे
इंदापूर : तालुक्यात तूर्तास लाॅकडाऊनची गरज नाही, असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज ( दि.१७ जुलै ) येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत व्यक्त केले.
इंदापूर शहरातील व ग्रामीण भागातील लोकांनी विशेषतः भाजी विक्रेत्यांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. मास्क न लावता फिरणारांवर दंडात्मक कारवाई केली जावी. पंचायत समितीच्या आरोग्य विभागासह इतर कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा फैैैैलाव होवू नये याची दक्षता घ्यावी, अश्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोनावर उपचार घेणारे तालुक्यातील ३२ रुग्ण ठणठणीत बरे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मास्क न वापरता फिरणारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. त्यामुळे तश्या लोकांचा वावर सध्या कमी झाला आहे, शहराच्या काही भागात सुरु असलेल्या पानटपऱ्या काही कालावधीसाठी बंद करण्यात येतील, अशी माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायणराव सारंगकर यांनी दिली.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे दिलीपराव पवार, भिगवण पोलीस ठाण्याचे जीवन माने, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व इतर मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.