गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मूर्तिकार चिंतेत
महाबुलेटीन नेटवर्क / अविनाश घोलप
घोडेगाव : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र कोरोनाचे सावट व पावसाने ओढ दिल्याने यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट राहणार आहे. त्यामुळे मोठमोठ्या गणेशमूर्तींची मागणी तर कमी झालीच परंतु छोट्या मूर्तीनांही कमी मागणी असल्याचे जिल्ह्याला होलसेल मूर्ती पुरवणारे गणेशमूर्तीकार श्रीधर राजगुरु यांनी सांगितले.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मूर्तीकार गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याच्या लगबगीत आहेत. दिवसभरात बऱ्याच मूर्ती रंगवण्याचे काम सुरू आहे. मात्र यावर्षी करोना महामारीच्या संकटाने या गणेशोत्सवावर महामारीचे सावट पडले आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई उग्ररूप धारण करत असल्याने त्याचा परिणाम गणपती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या साहित्यावर होत आहे. यापूर्वी सार्वजनिक गणेश मंडळी पाच हजार रुपये पासून २५ हजार रुपये किमतीच्या मूर्ती विकत घेत असत. मात्र यावर्षी फक्त चार फूट मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे शासनाचे धोरण असल्याने यावर्षी हा व्यवसाय संकटात आल्याचे आंबेगाव तालुक्याला मूर्ती पुरवणारे मूर्तिकार श्रीधर राजगुरू यांनी सांगितले.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस, रंग, विविधरंगी खडे यांच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे मूर्तीच्या दरातही वाढ होणार आहे. आता लहान मूर्तींना फार मागणी वाढू लागली असल्याने मूर्तिकार लहान मूर्ती तयार करण्यावरच भर देत आहे. ग्रामीण भागातील महिला गणेश मूर्ती तयार करण्याच्या कारखान्यात मजुरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात. परंतु यंदा करोनाच्या महामारीमुळे बाजारपेठेत विशेष उत्साह नसल्याचे व त्यांच्या मजुरीवर परिणाम झाला असल्याचे राजगुरू यांनी सांगितले.
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना एकशे एक रुपयांपासून ते अगदी पंचवीस हजार रुपयापर्यंत गणेशमूर्ती आम्ही पुरवत होतो. मात्र यावर्षी पाऊस लांबल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात भरीस भर म्हणून कोरोना महामारीचे संकट आले आहे. त्यामुळे मूर्तीचे फारसे बुकिंग झालेले नाही. दिवसेंदिवस हा व्यवसाय कठीण होत असून या व्यवसायातही शासनाने हातभार लावावा, असे मत गावडेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील मूर्तीकार श्रीधर राजगुरू यांनी व्यक्त केले.