गुन्हेगारी

बाजार समितीचे संचालक व माजी सभापती विलास कातोरे यांच्या जावयावर प्राणघातक हल्ला, जावई वकील ॲड. अभिजित जाधव गंभीर जखमी… ● चिंबळीत वकिलांसह कुटुंबियावरही हल्ला ● आळंदी पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल.. हल्लेखोर पसार

बाजार समितीचे संचालक व माजी सभापती विलास कातोरे यांच्या जावयावर प्राणघातक हल्ला, जावई वकील ॲड. अभिजित जाधव गंभीर जखमी…
● चिंबळीत वकिलांसह कुटुंबियावरही हल्ला
● स्मशानभूमीच्या दान केलेल्या जागेत विहिरीचे बांधकाम रोखल्याने झाला वाद..
● गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वडिलांची बदनामी केल्याचा जाब विचारल्याने हल्लेखोरांनी केला हल्ला
● आळंदी पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल.. हल्लेखोर पसार

महाबुलेटीन न्यूज
आळंदी : चिंबळी ( ता. खेड ) येथे खेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व माजी सभापती विलास कातोरे यांच्या जावयावर खुनी हल्ला झाला असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात वकील ॲड. अभिजित अर्जुन जाधव हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काल ( दि. २ जून ) सायंकाळी सातच्या सुमारास चिंबळी ( ता. खेड ) येथे अर्जुन जाधव यांच्या घरासमोर घडली. गावातील पाण्याच्या विहिरीचे बांधकाम रोखल्याने व गावातील ग्रुपवर वडिलांची बदनामी का केली याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ही घटना घडली आहे.

चार गाड्यांमधून आलेल्या १५ हल्लेखोरांनी वकील यांच्या डोक्यात लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने हल्ला केला असून या हल्ल्यात ॲड. अभिजित अर्जुन जाधव ( वय ३३ ) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर सचिन कालिदास जाधव ( वय ३६ ) यांच्या हाताचे बोट तुटले आहे. तसेच शांताराम तुकाराम जाधव, सौ. अमृता अभिजित जाधव व कार्यक्रमासाठी माहेरी आलेली मुलगी सौ. अश्विनी नितीन ठोंबरे यांना मारहाण करण्यात आली आहे. तसेच एका महिलेचा गळा दाबून विनयभंग केला आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ माऊली महादेव बर्गे, विद्यमान उपसरपंच चेतन तानाजी बर्गे, सागर संभाजी बर्गे, माऊली गोपाळ बर्गे, अजय तानाजी बर्गे, अमोल सुरेश बर्गे, सुरज हिरामण बर्गे, प्रणव शंकर बर्गे, धीरज हिरामण बर्गे व इतर ५ ते ७ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर फरार झाले असून आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. 

याबाबत पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार दिलेली अधिक माहिती अशी की, अर्जुन तुकाराम जाधव, कालिदास तुकाराम जाधव, शांताराम तुकाराम जाधव, बाळासाहेब तुकाराम जाधव या चार भावांनी सामायिक मालकीच्या चिंबळी येथील जमीन गट नं. १७ मधील ४ एकर जमीनपैकी ७ गुंठे जागा ग्रामपंचायतला स्मशानभूमीसाठी दान केलेली आहे, तसेच रामदास तुकाराम जैद, शिवनाथ जैद व बाबुराव जैद या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या मालकीची १३ गुंठे जागा स्मशानभूमीसाठी दान केलेली आहे. या जागेत १० वर्षांपूर्वी ग्रामपंचायतने स्मशानभूमी बांधली आहे. 

चार दिवसांपूर्वी या जागेत विश्वास बर्गे व इतर लोकांनी विहीर खोदण्यासाठी भूमिपूजन केले असता अर्जुन जाधव यांनी त्यांना सदर ठिकाणी विहीर खोदू नका, ही जागा आम्ही स्मशानभूमीसाठी दान केलेली आहे, असे समजावून सांगितले. त्यानंतर विहीर खोदण्याचे काम थांबविले.

जेसीबीच्या बकेट मध्ये बसलेला अर्जुन जाधव यांचा हाच तो फोटो

काल बुधवार, दि. २ जून २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ‘चिंबळी गावकरी’ या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्ञानेश्वर उर्फ माऊली बर्गे यांनी फिर्यादीचे वडील अर्जुन जाधव यांचा भूमीपूजनचे काम थांबविताना जेसीबीच्या बकेट मध्ये बसलेला व्हिडीओ टाकून त्याखाली “खरे पाहता स्मशानभूमीतील जागा ही पूररेषा नियंत्रणाच्या आतच आहे, लगतच्या हिस्सेदारांनी ही जमीन स्मशानभूमीमध्ये असताना देखील विहीर खोदण्याचे कामाला लगतच्या मालकांनी जो विरोध केला आहे, त्या जमीन मालकांचा जाहीर निषेध, निषेध, निषेध” असा मजकूर असलेला मेसेज टाकला.

त्यामुळे ज्ञानेश्वर बर्गे यांना फिर्यादीने कॉल केला असता त्यांनी तो उचलला नाही. त्यांनतर बर्गे यांनी सुमितला परत कॉल केला. यावेळी “तू चिंबळी गावकरी व्हॉट्सअप ग्रुपवर माझे वाडीलांबद्दल बदनामीकारक मेसेज का पाठविला?” असे विचारले असता शिवीगाळ व दमदाटी करून “तू चिंबळी फाटा येथे ये, तुझ्याकडे बघून घेतो,” असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. थोड्या वेळाने पुन्हा फोन करून “तू चिंबळी फाट्याला येतो का, नाहीतर मीच तुझ्या घरी येतो,” असे म्हणून दमदाटी दिली. यावेळी ‘”तुला काय करायचे ते कर” असे फिर्यादीने म्हटले.

त्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे घरासमोर ज्ञानेश्वर बर्गे याने लोखंडी पाईपने अभिजित अर्जुन जाधव याच्या डोक्यात, हातावर, पायावर मारहाण करून “तुला व तुझ्या लोकांना जिवंत ठेवणार नाही”, असे म्हणून मारहाण केली. घरातील सर्वजण त्यांना वाचवायला गेले असता चेतन तानाजी बर्गे, सागर संभाजी बर्गे, माऊली गोपाळ बर्गे, अजय तानाजी बर्गे, अमोल सुरेश बर्गे, सुरज हिरामण बर्गे, प्रणव शंकर बर्गे, धीरज हिरामण बर्गे व इतर ५ ते ७ जणांनी हातातील लाकडी दांडके, हॉकी स्टिक अशा हत्यारांनी फिर्यादीच्या कुटुंबातील लोकांना मारहाण केली. व हल्लेखोर पसार झाले.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.