आज सकाळी 10.00 वाजता मला एक वॉट्सअप्प संदेश मिळाला. खेडचे माजी आमदार श्री सुरेश भाऊ गोरे यांच्या निधनाची बातमी. या संदेशावर विश्वास ठेवनं केवळ अशक्य आहे. मी सन 2015 ते 2018 या कालावधीत खेडला तहसीलदार म्हणून कार्यरत असताना आदरणीय भाऊ आमदार होते. त्यांच्या सहवासातील क्षनांचा चलत-स्मृतीपट डोळ्यासमोर उभा राहिला. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार हा भाऊंचा प्रवास थक्क करणारा होता. सामान्य जनतेपासून ते अधिकारी /पदाधिकारी यांचे सोबतच त्यांचं अत्यंत सुसंस्कृत वागणं दृष्ट लागण्यासारखं होत. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष ते “सत्ताधारी शिवसेनाचा आमदार” ही बिरुद त्यांच्या कार्यकर्त्यासाठी कितीही अभिमानाचं असल तरी भाऊंचे पाय मात्र शेवटपर्यंत मातीवरच होते.
अत्यंत निगर्वी, सतशील, शालीन, सुसंस्कृत अस हे व्यक्तिमत्त्व होते. द्वेष, मत्सर, इर्षा, असूया या साऱ्यांना आयुष्यात थारा न देणारे भाऊ म्हणून लहान बालकांसारख निरागस स्मितहास्य करीत असत. विविध बैठकांच्या निमित्ताने तसेच अनेक अशासकीय कार्यक्रमांना भाऊंची उपस्थिती ही त्या कार्यक्रमांची नैतिक उंची वाढवणारी ठरत असे, राजकारण हा भाऊंचा पिंडच नव्हता मुळी !
जे जे उत्तम, उदांत्त, उन्नत ते ते एकत्र ठेवण्यासाठी संघटन, आणि या संघटनातून समाजकार्य ही भाऊंची जीवनशैली होती.
आदिवासी भागातल्या ठाकर समाजाच्या महिलांशी लीलया हितगुज करणारे भाऊ, त्याच सहजपणे पंचतारांकित औद्योगिक वसाहतील उद्योगपतींशी संवाद साधू शकत. विधिमंडळात सामान्य जनतेचा आवाज पोहचविताना, सर्वाधिक प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी ही भाऊंची ओळख, त्यांचं जमिनीशी असलेलं नातं अधोरेखित करते !
दररोज 30 ते 40 विवाह समारंभ, साखरपुडे, गंधाक्षता, वाढदिवस, दशक्रिया विधी यांना हजर राहताना भाऊ कधीही थकल्याचे दिसले नाही. शासकीय कामासाठी दूरध्वनी केल्यावरही मी 2 मिनिटे बोलू शकतो का? असं विनम्रपणे अधिकाऱ्यांना विचारणारा भाऊंसारखा नेता केवळ विरळच!
माळकरी कुटुंबातील शुद्ध सात्विक आहाराच महत्व अनेकांना पटवून देणाऱ्या भाऊंच्या सात्विकतेच रहस्य वारकरी परंपरा व शाकाहार हेच होत. मी खेड सोडल्यानंतर पुणे व नागपूर येथे भाऊंची भेट झाली. त्यांच्यातील आपुलकी तसूभरही कमी झाल्याचे जाणवल नाही.
मी सध्या पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आहे हे समजल्यावर….”आता देवाचं दर्शन देणारा हक्काचा माणूस तेथे आहे म्हटल्यावर मी नक्की येईल !” असा शब्द खरं तर भाऊ तुम्ही मला दिला होता. खेडला असताना केलेल्या वन भोजनाची आठवण काढून परत एकदा मासवडी खायला या, हेही तुम्ही मला आग्रहाने सांगितले होते.
दि 11 सप्टेंबरला रात्री तुम्ही मला “hi” असा मेसेज पाठवलात, मी त्यावर आपणास 🙏जोडले. काही मिस्कील टिप्पणी आपण कराल म्हणून वाट बघितली, फोन करून खूपदा संपर्क केला पण आपण फोन उचलला नाही, नंतर आपण आजारी असल्याचे समजले. स्वतःचं आयुष्य जनसामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी व्यथित करणाऱ्यालाच कोरोना का गाठतो? याचं उत्तर मिळत नाही.
भाऊ श्री विठ्ठलाच दर्शन, मासवडीचे जेवण, राजकारण व समाजकारणांच्या गप्पा हे तसेच ठेऊन तुम्ही अकाली एक्झिट घेतली !
तुमच जाणं माझ्या सारख्या अनेकांना चटका लावून गेलं. तुम्ही शब्दांचे पक्के तरीही असं न सांगता गेलात…..? हे मन मान्य करीत नाही. तुमच्या आठवणीत तुमचा गुणगौरव करताना नकळत सुरू असलेला अश्रूंचा अभिषेक हे लिहिणं थांबवयाला मजबूर करीत आहे.
भाऊ…. तुम्ही स्वभावास अनुसरून नि:स्वार्थपणे अगदी सहज निघून गेलात. तुमची ही एक्झिट सहनशीलतेच्या पलीकडची आहे आणि आम्हाला एकटं पाडणारी सुद्धा आहे !
तुमच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन !!! श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली …🙏🙏😭😭💐💐
– श्री विठ्ठल जोशी,
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.