महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
गणपती विसर्जन मिरवणूकीची सुरूवात १८९३ मध्ये गणेश उत्सव सुरू झाला त्याच वर्षी झाली. त्या वर्षी बुधवार पेठेतील कोतवाल चावडी मधील लकडे सुगंधी यांच्या दुकानात बैठक होऊन मिरवणूक सामुदायिकरित्या अनंत चतुर्दशीला काढण्याचे ठरले. त्यात फक्त तीनच सार्वजनिक गणपती होते.
बैठकीला कै.लकडे, कै.गणपतराव सोहोनी, कै.गणपतराव घोटवडेकर, कै.भाऊ रंगारी इ. मंडळी उपस्थित होती.
लो. टिळकांसारखा खंबीर महापुरुष या उत्सवामागे असल्याने १८९४ मध्ये शंभरच्या पुढे सार्वजनिक गणपती…. स्वतः टिळकांनी विंचूरकर वाड्यात उत्सव चालू केला. परंतु या वर्षी नऊ दिवस व्यवस्थित पार पडले व अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री दारुवाला पुलाजवळ मोठी दंगल होऊन त्यात एकाचा मृत्यू व तणाव झाला. दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघते की नाही, अशी परिस्थिती. सुरुवातीपासूनच समाजातील काही लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा विरोध. परंतु त्यास न जुमानता तेव्हाचे कलेक्टर श्री ओम्यानी यांनी मिरवणूकीस परवानगी दिली आणि रे मार्केट (म.फुले मंडई) येथे गणपती जमण्यास सुरूवात झाली.
परंतु मिरवणूकीत कोणी अग्रभागी राहायचे याबद्दल वाद… तेव्हा ब्रह्मगिरीबुवा, लो.टिळक व अण्णासाहेब पटवर्धन यांनी ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला अग्रक्रम व त्या पाठोपाठ श्री जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा हे पहिले पाच तर भाऊ रंगारी, अखिल मंडई आणि श्रीमंत दगडूशेठ हे शेवटचे तीन असा क्रम ठरवून दिला तो आजतागायत चालू आहे.
पुढे १८९६ पासून १९०८ पर्यंत प्लेगचे सावट… परंतु उत्सवावर त्याचा फारसा परिणाम नाही. फक्त १९०० मध्ये प्लेग व दुष्काळ यामुळे गणपतींची संख्या कमी, पण उत्सव थांबला नाही.
१९०८ मध्ये लो. टिळकांना शिक्षा झाली, त्यामुळे देशभक्ती व जनजागृतीचे उत्सवात दर्शन व सरकारचे निर्बंध आले.
१९१२ मध्ये तर जाहिरनामा उत्सवात देवांखेरीज इतर नावांचा उच्चारही न करणे आणि राजद्रोही लोकांचे फोटो न लावणे, सरकारी नोकर, विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्सवात भाग न घेणे…
इ. सन १९१६ मध्ये पाऊस व प्लेग यांचा पुन्हा उपद्रव….
१ आॕगस्ट १९२० रोजी लो. टिळकांचा मृत्यू झाला. परंतु उत्सव नेहमीप्रमाणे. हिंदूंनी ताबूतापुढेही मेळे केले. दोन्ही धर्माचे लोक दोन्ही उत्सवात सहभागी झाले.
१९२२ मध्ये तर गणपती व ताबूत शेजारी शेजारीच.
१९२८ मध्ये भाद्रपद अधिक आल्याने काही लोकांनी नवीन तर काहींनी जुन्या पंचागाप्रमाणे असे दोन उत्सव अर्थात मिरवणूकाही दोन ( २९ ऑगस्ट व २८ सप्टेंबर ) एकात कसबा तर दुसऱ्यात जोगेश्वरी अग्रभागी.
१९४२ मध्ये कायदेभंगाची चळवळ व उत्सवावर बंधने, मिरवणूकीवर बंदी,संचारबंदी त्यामुळे गणपतीची उत्तरपूजा करून मिरवणूकीला परवानगी मिळेपर्यंत मूर्ती जागेवरून न हलवण्याचा सर्वानुमते निर्णय. प्रदीर्घ काळ वाट बघून शिवरामपंत केळकर यांनी रास्ता पेठ गणपतीची कोजागिरीला ( २३आॕक्टो ) दु.१ वा. मिरवणूक काढली. मंडईजवळ मिरवणूक अडवून धर्मवीर विश्वासराव डावरे आणि न. चिं. केळकर यांना अटक. अखेर ३ नोव्हेंबर रोजी तब्बल चाळीस दिवसांनी मिरवणूकीस परवानगी मिळून ती निर्विघ्नपणे पार पडली.
१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याने आपोआपच गणपती मंडळांची संख्या ३०० पर्यंत वाढली.
१९४८ मध्ये गणेशोत्सवाच्या काळातच हैद्राबाद विलीनीकरणाची कारवाई आणि मिरवणूकीच्या दिवशीच निजामाच्या शरणागतीची बातमी त्यामुळे मिरवणूकीत आनंदोत्सव.
१९५१ ते १९६० हा खरा गणेशोत्सवाचा सुवर्णकाळ या काळात मंडळ वाढून मिरवणूक लांबण्यास सुरूवात.
१९६० मध्ये प्रथमच मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत आणि त्याच वर्षी पानशेतच्या पुराने पुण्यात थैमान घातलेले पण त्याचा उत्सवावर फारसा परिणाम झाला नाही हे विशेष.
१९६४ साली नवीन प्रथा मिरवणूकीच्या अग्रभागी सुमित्रा हत्तीण येऊ लागली ती प्रथम गजाननाला सोंड उंचवून मुजरा करे व मिरवणूकीला सुरुवात होई. तीच्या पाठीवर अंबारी त्यात छत्रपती शिवराय व लो. टिळकांचा फोटो व भगवा ध्वज असे.
१९७१ मध्ये सुमित्रा थकल्याने तीची जागा अनारकली या हत्तीणीने घेतली. पुढे बरीच वर्षे सेवा दिली. त्यामुळे श्री कसबा गणपती मंडळाने पुढाकार घेऊन पुणेकरांतर्फे अनारकली हत्तीणीचा भव्य एकसष्टी समारंभ करून कृतज्ञता व्यक्त केली.
१९८९ मध्ये पायाच्या दुखण्यामुळे अनारकली मिरवणूकीत सामिल न होता फक्त गजाननास मुजरा करून निघून गेली व तेव्हापासून मिरवणूकीत तीची अनुपस्थिती.
१९६५ मध्ये युद्ध आणि दंगल यामुळे थोडी बिकट परिस्थिती. ३० आॕगस्टला गणपती बसले आणि १ सप्टेंबरला शेख हसन महंमद ऊर्फ हल्या याने मंडई गणपतीची विटंबना केली व पुण्यात दंगल कर्फ्यु. काही ठिकाणी गोळीबार. मात्र मिरवणूक ९ सप्टेंबरला सकाळी ८ वा. सुरु होऊन चोख बंदोबस्तात दुपारी ४.१५ वा.संपली.
१९६८ मध्ये मिरवणूक लवकर संपावी म्हणून सकाळी ११.१५ वा. सुरू झाली परंतु संपली मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ ला.
१९८० मध्ये श्री कसबा गणपती मंडळाने प्रथमच मिरवणूकीत गुलालाचा वापर बंद करून अष्टगंधाचा टिळा लावून पुणे शहरात एक आदर्श निर्माण केला. त्याचे अनुकरण अनेक मंडळांनी केले व मिरवणूकीत महिलांच्या सहभागाला सुरूवात झाली.
१९८३ पासून श्री कसबा गणपती चांदीच्या पालखीत विराजमान झाल्याने दर्शनाला अजूनच झुंबड उडाली.
१९८५ पासून श्री कसबा गणपती मंडळाने पालखी प्रत्येक चौकात येण्याच्या वेळा निश्चित करून शिस्तबद्ध मिरवणूकीचा अजून एक पायंडा ठेवला.
१९८८-८९ पासून मिरवणूकीत महिलांचा सहभाग वाढू लागला व मिरवणूकीला अजून शोभा आली.
१९९२ हे तर शताब्दी वर्ष असल्याने सगळीच मिरवणूक शोभिवंत.
१९९३ हे त्वष्टा कासार समाजाचे शताब्दी वर्ष उत्सवाच्या काही दिवस आधीच एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे त्यांच्या मंडपास आग लागून मंडप जळून खाक. परंतु मा. काका वडकेंच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पुन्हा सगळं जिद्दीने उभं केल, हे नमूद करण्यासारखे आहे.
१९९८ पासून मिरवणूकीत ध्वनिवर्धकांच्या भिंती व हळूहळू डीजे चा धमाका वाढून ध्वनिप्रदूषणाने कळस गाठला.
२००४ पासून मिरवणूकीतही जाहिरात, प्रायोजकांचा प्रवेश वाढू लागला.
२००६ च्या मिरवणूकीवर “वंदेमातरम् ” च्या शताब्दीचा प्रभाव.
२००९ ला स्वाईन फ्लू ची दहशत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग नसलेली कित्येक वर्षानंतरची ही मिरवणूक होती.
२०१० च्या मिरवणूकीत मोबाईलचा मोठा प्रभाव.
मिरवणूकीत शिस्तबद्धपणा आणण्यासाठी ज्ञानप्रबोधीनीने लेझीम, ढोलपथक, ध्वजपथक आणले. त्यापाठोपाठ गरवारे प्रशाला, रमणबाग प्रशाला इ. शाळांनी पथके उभी केली. परंतु नंतर खेड्यापाड्यातून आणि निरनिराळ्या संस्थेने ढोल पथक उभी करून फारच स्पर्धा उभी केली.
मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे २००५ मध्ये मिरवणूक ३३ तास २० मिनिटे चालली.
यंदा २०२० मध्ये कोविड १९ मुळे विसर्जन मिरवणूक रद्दच करण्यात आली.
दुसरी गोष्ट म्हणजे मिरवणूकीत सामिल होण्यासाठी प्रभात बँडला न. चि. केळकर यांनी फक्त एक रुपया दिला होता, तर मधल्या काळात ही प्रथा बंद पडलेली. ती चालू करण्यास श्री कसबा गणपती मंडळाकडून कै. बंडोपंत सोलापूरकर यांच्याशी बोलून १९७५ मध्ये फक्त ५१ रुपयात मिरवणूकीत सामिल होण्याचे तसेच कै. प्रभाशंकर गायकवाड व सुभाष देवळणकर यांना १०१ रुपयात दहा दिवस सेवा व मिरवणूकीत सहभागाचे निमंत्रण दिले. त्यांनीही मोठेपणाने त्याचा स्विकार केला. नुकतेच २०१५ मध्ये गणपती मूर्ती चे विसर्जन प्रदुषणाचा विचार करून नदीपात्रात न करता म.न.पा. ने तयार केलेल्या स्वच्छ पाण्याच्या हौदात करण्याचा श्री कसबा गणपती मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेतला त्याला अनेक मंडळांनी पाठिंबा देऊन अनुकरणही केले.
एकूणच आजपर्यंतचा मिरवणूकीचा इतिहास थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी अनेक कात्रणे आणि गणेश विसर्जन मिरवणूक ( श्री. मंदार लवाटे ) या पुस्तकाचा यासाठी उपयोग झाला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…..
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.