आरोग्य

त्या आल्या…. त्यांनी पाहिलं…आणि त्यांनी जिंकलं!

त्या आल्या…. त्यांनी पाहिलं…आणि त्यांनी जिंकलं!
महाबुलेटीन न्युज नेटवर्क : हनुमंत देवकर
खरंतर आयर्न लेडी असा नावलौकिक त्यांचा…अखिल विश्वात दबदबा! त्यांनी भारतीय जनमनावर एखाद्या अनभिषिक्त सम्राज्ञी प्रमाणे राज्य केलं. देहातील अखेरच्या रक्ताच्या थेंबापर्यंत त्या भारतमातेसाठी झिजल्या. त्यांनी भारताची प्रतिमा संपूर्ण विश्वात कणखर अशी केली…. होय, त्याच….. त्यांना चाकणमध्ये येऊन बरोबर पंचावन्न वर्षे झालीत. या अर्धशतकी इतिहासाचा मागोवा घेता असेच म्हणावे लागेल की, “त्या आल्या, त्यांनी पाहिलं अन त्यांनी जिंकलं….!”

आज या घटनेला बरोबर 55 वर्ष झालेत. 24 मे 1966 चा तो दिवस… चाकण येथील विजय ऑइल मिल समोरील  पटांगणात मंडप घातला होता. मंडपामध्ये साधारण दहा हजाराच्या आसपास नागरिक जमले होते. अर्थात ‘त्यांना’ पाहण्यासाठी लोक आतुर झाले होते. त्या जनसमुदायामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. अखेर प्रतिक्षा संपली… ‘त्या’ आल्या… डोळ्याला काळा गॉगल, गळ्यात रुद्राक्षाची माळ, केसांची ती पांढरी बट… सिक्युरिटीच्या गराड्यात त्या पोहोचल्या… एकच जयजयकार झाला. ‘त्या’-होत्या भारताच्या लाडक्या पंतप्रधान, आयर्न लेडी इंदिराजी गांधी! 

प्राथमिक आरोग्य केंद्र चाकण

खेड तालुक्यातील दुष्काळी स्थिती, नाला बंडींग कामे, लिफ्ट  इरिगेशन कामासंदर्भात तो पहाणी दौरा होता. अगदी वेळेत पंतप्रधान इंदिराजी आल्या. तत्कालीन आमदार वसंतराव मारुतराव मांजरे यांच्या आग्रहावरून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या मॉडेलचे उदघाटन इंदिराजींनी केले. खरेतर हा प्रोग्रॅम दौऱ्यात नसतानाही आमदार मांजरे यांचा आग्रह लक्षात घेऊन इंदिराजी यांनी चाकण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ( सध्याची ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत ) व याच इमारतीतील सौ. शांताबाई मोहनलाल लुंकड प्रसूती गृहाचे उदघाटन करून पंधरा मिनिट भाषण केले. भाषणानंतर त्या चक्क सुरक्षा कवच बाजूला सारून महिलांमध्ये मिसळल्या. आणि आपल्या गळ्यातील हार व हातातील पुष्प महिलांना दिले.. हा अनुभव त्यावेळी उपस्थित महिलांसाठी रोमांचित करणारा होता. 

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, केंद्रीय संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, पुण्याचे पालकमंत्री शंकरराव बाजीराव पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजाराम बापू पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब मगर, आमदार मामासाहेब मोहोळ, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रामभाऊ कांडगे, जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव उरसळ, उपाध्यक्ष शिवाजीराव काळे, बांधकाम विभागाचे सभापती साहेबराव सातकर, पुणे जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष बाबूभाई शहा, खेड पंचायत समितीचे सभापती माणिकराव शिवळे पाटील, उपसभापती सयाजीराव कोहिणकर, हॉस्पिटल कमिटीचे अध्यक्ष व लुंकड ऑइल मिल ( सध्याचे नवमहाराष्ट्र चाकण ऑइल मिल ) चे मालक उद्योगपती मोहनलाल लुंकड, उद्योजक साहेबराव तथा एस. पी. देशमुख, चाकण गावचे सरपंच निवृत्ती मारूती नाणेकर, खेडचे सरपंच हरकचंद कासवा आदी मान्यवर उपस्थित होते.

इंदिराजींचा ताफा पुढे खेडला सरकला. यावेळी चाकण गावचे उपसरपंच बैलगाडा मालक नामदेव बिरदवडे, उद्योजक बाबूशेठ बोथरा, व्यापारी लातीफभाई काझी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बबनराव गोतारणे, गांधीवादी कार्यकर्ते ग्रा. पं. सदस्य दादासाहेब गोरे, नारायण मुटके, शंकरराव वाघ, संसुभाई सिकिलकर, पंडित मेदनकर, चाकण सहकारी सोसायटीचे चेअरमन शंकरराव मांजरे, बाळकू नाना कड ( कडाचीवाडी ), भाऊसाहेब कड ( खराबवाडी ), महादेव सातव ( खराबवाडी ), बबनराव जाधव ( नाणेकरवाडी ), तुकाराम जाधव ( आगरवाडी ) आदी तरुण कारभारी या ताफ्यात सहभागी झाले होते. आणि त्यानंतर खेड येथील आत्ताच्या मार्केट यार्ड जवळील ऑइल मिलच्या पटांगणावर इंदिराजींची अधिकृत सभा झाली. 

सभेपुर्वी शिरोली येथील पहाणी दौऱ्यात प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते दत्तोबा सावंत यांच्या केंबळाच्या घरासमोरील अंगणात त्यांची म्हातारी आई बसल्याचे इंदिराजींनी पाहिले. त्या कुतूहलाने तिकडे गेल्या, अन थेट सावंत यांच्या घरात गेल्या. त्यांच्या आईकडून घरातील गाडग्यांची उतरंड आणि टांगलेले शिंकाळे यांची माहिती करून घेताना इंदिराजींच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. इतकी मोठी व्यक्ती आणि इतक्या साध्या घरात आस्थेने विचारपूस पाहून उपस्थितांना त्यांनी जिंकले होते.

दरम्यान, चाकण ते खेड प्रवासात रोहकल फाट्यावर काही आदिवासी महिला पारंपारिक वेशात उभ्या होत्या. त्यांना पाहून इंदिराजींनी ताफा थांबवला. त्या महिलांच्या हातातील रानफुले व टणटनीच्या फुलांच्या स्वागतमाळा इंदिराजींनी स्वीकारल्या आणि केव्हढे अप्रूप त्या महिलांना झाले!

खेडचा इंदिरा तलाव :-
खेड तालुक्याची दुष्काळी पाहणी करताना इंदिराजींनी खेडच्या घाटातील पाझर तलावाचे भूमिपूजन केले, आणि तेंव्हापासून सटवाई मंदिर तलाव इंदिरा पाझर तलाव नावाने प्रसिद्ध झाला..

 

 

अजब… 24 मे रोजी या घटनेला पंचावन्न वर्षे पूर्ण झाली. इंदिराजींच्या त्या दौऱ्याच्या आजही आठवणी प्रत्यक्षदर्शी सांगतात. भारतीय इतिहासात अनेक ‘द ग्रेट प्राईम मिनिस्टर’ होऊन गेले. इंदिराजी त्यात अग्रनामांकीत होय. आपल्या विविध प्रसंगांनी त्यांनी आठवणी मागे सोडल्यात. इतिहासाची पाने चाळताना जुनी जाणती माणसे या आठवणी सांगताना थोर मंडळींचे थोरपण अधोरेखित करतात. असाच खेडच्या इतिहासातील इंदिराजींचा हा दौरा प्रसंग. आज यास पंचावन्न वर्षे झाली. यानिमित्ताने महाबुलेटिन न्यूजने घेतलेला हा धांडोळा….
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.