महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
नारायणगाव : जुन्या पिढीतील तमाशा कलावंत व कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर या तमाशा फडाच्या संस्थापिका कांताबाई तुकाराम खेडकर-सातारकर (वय ८५) यांचे आज (ता. २५ मे) सायंकाळी संगमनेर येथे वृद्धपकाळाने निधन झाले. कांताबाई या मूळच्या सातारा जिल्ह्यातील असल्याने कांताबाई सातारकर या नावाने त्या परिचित होत्या. (Veteran Tamasha artist, Kantabai Satarkar passed away)
तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या तमाशात त्या गायिका व नृत्यांगना म्हणून काम करत होत्या. शाहीर पोवाडा गायनात त्यांचा विशेष नावलौकिक होता. फडमालक (स्व.) तुकाराम खेडकर यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. आघाडीचे फडमालक रघुवीर खेडकर हे त्यांचे पुत्र असून प्रख्यात तमाशा कलावंत मंदा, अलका व बेबी या त्यांच्या कन्या आहेत.
तुकाराम खेडकर यांचे निधन झाल्यानंतर १९७० च्या सुमारास अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर या नावाने तमाशा फड सुरू केला. राज्यातील आघाडीच्या फडात या तमाशाची गणना होते. वयाच्या ७० वर्षांपर्यत त्या त्यांच्या स्वतःच्या तमाशात काम करत होत्या. तमाशाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, लोक शिक्षणातून जनजागृत करण्याचे काम केले.
त्यांनी साकारलेली कोंढाण्यावर स्वारी, विशाळगडची राणी, रायगडची राणी, पाच तोफांची सलामी, क्रांतिसिंह नाना पाटील ही ऐतिहासिक वगनाट्य व कोर्टाच्या दारी फुटला चुडा, का माणूस झाला सैतान, असे पुढारी आमचे वैरी ही समाजिक वगनाट्येही विशेष गाजली. कोंढाण्यावर स्वारी या वगनाट्यात त्यांनी साकारलेली जिजामातेची भूमिका विशेष गाजली. या भूमिकेबद्दल माजी मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना सन्मानित केले होते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने (स्व.) विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
“ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
“तमाशाचा कुठलाही वारसा नसताना त्यांनी स्वतःला मिळालेल्या कलेच्या दैवी देणगीच्या जोरावर अत्यंत परिश्रमाने तमाशा क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले होते. तमाशात पुरुष भूमिका सहजतेने साकारणाऱ्या कांताबाईंनी महिला प्रेक्षकांना तमाशाकडे खेचून आणले. आपल्या उत्तम गायन, नृत्य आणि अभिनयातून त्यांनी तमाशाला पांढरपेशा समाजातही मानाचे स्थान मिळवून दिले होते.
तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पहिला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे पुत्र रघुवीर, कन्या आणि सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
———————————-
● तमाशा सृष्टीतील एक तारा निखळला : संभाजी जाधव ( कार्याध्यक्ष अखिल भारतीय तमाशा परिषद ) :-
कांताबाई सातारकर ह्या नृत्य, अभिनय, गायन या कलेत पारंगत होत्या. एकाच वागनाट्यात त्या पुरुष व स्त्री भूमिका साकारत होत्या. लोक कलेची महाराणी म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनामुळे कलावंत आईच्या मायेला पोरके झाले असून तमाशा सृष्टीतील एक तारा निखळला आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय तमाशा परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजी जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.