सण-उत्सव

संक्रांतीनिमित्त महिलांची मंदिरात वाण-वसा घेण्यासाठी गर्दी

 

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : मकरसंक्रांतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर सुवासिनी सीतामाईचे दर्शन घेवून अखंड सौभाग्याचा वसा घेतात. त्यामुळे सौभाग्य वृध्दिंगत होते, अशी श्रध्दा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चाकण व परिसरातील गावांमधील मंदिरांमध्ये हजारो महिलांनी सीतामाईला वाण-वसा देऊन प्रभू श्रीराम व सीतामाईचे मनोभावे दर्शन घेतले.

प्रतिवर्षीप्रमाणे सकाळ पासून सुवासिनींनी सीतामातेला वाण-वसा देण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. एकमेकींना वाण-वसा दिल्यानंतर ‘सीतेचा वसा, जनम जनम वसा’ असे म्हणत सौभाग्याचे लेणे लेवून एकमेकींना हळदी-कुंकू लावत होत्या. संपूर्ण मंदिर परिसरात हळदीकुंकवाचा सडा पडला होता.

मकरसंक्रांती निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिर व परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, महाळुंगे, खालूंब्रे गावातील मंदिरांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. चक्रेश्वर मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची आणि सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यावर्षी कोरोनामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवून सर्वांना सहजतेने दर्शन मिळण्याची सुविधा देण्यासाठी मंदिराच्या आवारात रांगेने शिस्तीने जाऊन महिलांना दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

फोटो : खराबवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात महिलांनी वाण-वसा घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

दुपारनंतर महिलांची प्रचंड गर्दी
————————————-
सकाळपासूनच मंदिर परिसरात महिलांची गर्दी होती. महिलांनी चाकण परिसरातील चक्रेश्वर मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, श्रीराम-सीता मंदिर, दत्त मंदिर, झित्राई मंदिर, राणूबाई मंदिर, वाघजाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर, काळूबाई मंदिर, जोपादेवी मंदिर, श्री गणेश मंदिर, खंडोबा मंदिर आदी सर्व मंदिरात जाऊन वाण-वसा दिला, घेतला.

आपल्या जीवनातील गोडवा टिकवून ठेवणारा आणि दररोजची धावपळ, ताणतणाव बाजूला ठेवून ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण शहर-परिसरात पारंपरिकरित्या साजरा करण्यात आला. यादिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होत असल्याने हिंदू संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने सर्वांनी संक्रांत साजरी केली. पतंग उडविण्याचा आस्वाद घेतानाच इमारतींच्या गच्चीवर मनमुराद नाचण्याचा आनंद बालक व युवावर्गाने घेतला.

शहरात सकाळपासूनच प्रत्येकाच्या घरी पै-पाहुण्यांची लगबग पाहावयास मिळाली. बालचमूंनी प्लास्टिकचे रंगीबेरंगी व कार्टुन्सच्या आकारातील डबे हाती घेऊन थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेत व मित्रांना तिळगूळ देत आनंद लुटला. नागरिकांनी, युवक-युवतींनी एकमेकांना एसएमएसद्वारे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय सोशल मीडियाद्वारेही संदेशांची देवाण-घेवाण झाली.

मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी हळदीकुंकू कार्यक्रमास प्रारंभ केला. अनेक ठिकाणी महिलांनी मंदिरात हळदीकुंकू कार्यक्रम घेतले. महिलांनी या दिवशी हिंदू शास्र पद्धतीप्रमाणे सहावारी व नऊवारी साडी नेसून विशेष पारंपरिक पोषाख परिधान केला होता. पाच सुगडीत गव्हाचे ओंबे, ज्वारींची कणसं, तिळगूळ, गाजर, ऊस, हरभरा, हावरीचे तीळ टाकून सुगडीत दिले. महिलांनी मंदिरात सुगडीचे पूजन केले. मंदिरात मूर्तीसमोर मोठ्या आनंदात एकमेकींना हळदी-कुंकू लावले. सुगडी वाण एकमेकींना देऊन संक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यातच काही महिलांनी मंदिरात उखाणे घेऊन पारंपरिकता जपली.

सकाळपासूनच घरोघरी संक्रांत सणाची लगबग सुरू झाली होती. गल्लोगल्ली तिळगूळ देण्यासाठी लहानग्यांची धावपळ सुरू झाली होती. सायंकाळी तिळगूळ वाटण्यासाठी लोक घराबाहेर पडले. मंदिरात जाऊन देवदर्शनानंतर ‘तीळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणत एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. घरोघरी सुवासिनींच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला बहर आला होता. संक्रांतीच्या सणाच्या आनंदाला उधाण आले होते. मकर संक्रांत म्हणजे सुवासिनींचे वाण, तिळगुळाचे फक्कड लाडू, काटेरी रंगीबेरंगी हलवा आणि गोडधोड जेवणाचा बेत अशा वातावरणात सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले होते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी उत्साहात साजरी करण्यात आली. तीळ लावलेली भाकरी, विविध भाज्यांच्या मिश्रणाची भाजी, चटण्या, दही असा जेवणाचा बेत घरोघरी रंगला होता.

वर्षभरात जन्मलेल्या बालकांना हलव्यांचे दागिने घालून ‘बोरन्हान’ केले गेले तर नवविवाहीत मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व असल्याने घरोघरी नवविवाहितांच्या आनंदाला उधाण आले होते. संक्रांतीनिमित्त परिसरातील सर्वच धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी दिसून आली. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत व तिसरा दिवस किंक्रातीने संक्रांत सणाचा समारोप होणार आहे.
————————————————————

 

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

3 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

3 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

4 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

5 months ago

This website uses cookies.