पुणे जिल्हा

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत येथील हॉटेल कांचन व्हेजला भीषण आग, हॉटेल आगीत जळून भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत येथील हॉटेल कांचन व्हेजला भीषण आग, हॉटेल आगीत जळून भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
यवत ( दि.१ जून ) : पुणे-सोलापूर हायवेवरील यवत ( ता. दौंड ) येथील प्रसिद्ध “कांचन व्हेज” हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत हॉटेल मधील विविध साहित्य, वस्तू, फर्निचर जळून खाक झाले आहे. ही घटना आज (दि.१) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. हॉटेलच्या गॅस ठेवलेल्या भागात प्रथमतः आग लागली, आणि काही क्षणात हॉटेलची मुख्य इमारत व किचन मध्ये मोठ्या प्रमाणावर आग पसरली. आगीत लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले आहे. 

महामार्गाच्या लगत असलेल्या हॉटेल कांचन व्हेज मध्ये आग लागल्याचे समजताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी व हॉटेल मधील सर्व कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र अर्धा तास उलटल्यानंतर देखील आगीनशामक दल घटनास्थळी आले नाही, त्यामुळे अर्ध्या तासात संपूर्ण इमारती मधील लाकडी फर्निचरचे साहित्य व गवताळ भाग आगीमध्ये जळून खाक झाला. अर्धा ते पाऊण तास ही आग सुरू होती. रस्त्यावरील प्रवाशांना आगीचे आणि धुराचे मोठे लोट हवेत उंच जाताना दिसत होते.

दरम्यान दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास यवत मधील आबा प्रल्हाद दोरगे, अक्षय राऊत व त्यांचे मित्र कांचन हॉटेल येथे पार्सल घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना हॉटेलच्या मुख्य इमारतीच्या बाजूला असलेल्या खोलीतून धूर निघत असल्याचे दिसले. काही कळण्याच्या आत धुराचे रूपांतर आगीत झाले.  आबा दोरगे, अक्षय राऊत व हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी तातडीने तेथे असलेले आठ ते दहा गॅस सिलेंडर बाहेर काढले. पोलीस हवालदार संपत खाबाले यांनी तातडीने अग्निशामक दलाला फोन करून पाचारण केले. संदीप दोरगे यांनी अग्निशामक दल येईपर्यंत गावातील तीन पाण्याचे टँकर आग विझविण्यासाठी आणले होते. मात्र तोपर्यंत आग कमी होत गेली होती. सुदैवाने हॉटेल मधील सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहाणी झाली नाही.

हॉटेल मालक विवेक कांचन, प्रसाद कांचन, अरुण कांचन व त्यांचे कुटुंबीय यांनी मोठ्या कष्टाने मागील काही वर्षात कांचन व्हेज हॉटेलला नावलौकिक मिळविला होता. आज त्यांच्या डोळ्यासमोर हॉटेल जळत असताना विझविण्यासाठी प्रयत्न करताना कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा होऊ नये, यासाठी ते काळजी घेत होते. जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, यवतचे उपसरपंच सुभाष यादव, गाव कामगार तलाठी कैलास भाटे, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे आदी घटनास्थळी उपस्थित होते.

चार वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ येथील अद्योगिक वसाहत, दौंड नगरपरिषद व पीएमआरडीएचे अग्निशामक बंब दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गॅस गळती झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक अंदाज घटनास्थळी व्यक्त केले जात होते. 

● पुणे-सोलापूर महामार्गावरून जाणारे सिने अभिनेते, सेलिब्रिटी, राजकीय नेते व उच्चभृ कुटुंबांसाठी “कांचन व्हेज” विशेष प्रसिद्ध होते. सिने अभिनेते सचिन खेडेकर, अलका कुबल, अमृता खानविलकर यांच्यासह विविध पक्षाचे पुढारी,  शासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासाठी कांचन हॉटेल खास मेजवाणीचे ठिकाण होते. ग्रामीण ढंगातील, सकस व रुचकर जेवणासाठी अनेक जण येथे थांबून राहत असत. 

कांचन व्हेज मध्ये दुपारच्या वेळी जेवणासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. कोरोनाच्या साथीत लॉकडाऊनमुळे हॉटेल मध्ये केवळ पार्सल सेवा उपलब्ध होती. इतर वेळी ही आगीची घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

● घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गावात कोरोनाच्या साथीत अनेकांचा बळी गेला, तर कित्येक जण बाधीत झाले होते. मागील काही दिवसात कोरोनाची साथ काहीशी आटोक्यात आली असली, तरी अजूनही कोरोना संपलेला नाही याचे कसलेही भान नागरिकांना राहिलेले नव्हते. गर्दी वाढतच असल्याने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी गर्दी करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईची तंबी दिल्यानंतर काहीशी गर्दी कमी झाली, मात्र पोलिसांना सारखी गर्दी हटवावी लागत होती.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.