महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चासोबत आहे. आरक्षण मिळण्यासाठी प्रसंगी आमदारकीवर पाणी सोडायला देखील कमी करणार नाही, असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
खेड तालुका सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार मोहिते पाटील यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मोर्चाच्या वतीने निवेदन दिल्यानंतर आमदार मोहिते म्हणाले, न्यायालयासमोर बाजू मांडायला कमी पडलो असे आंदोलक म्हणत आहेत. न्यायालयात बाजू मांडू नये यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. मराठा आरक्षण नाकारण्याचे काम भाजप सरकारने केले. राज्यात वाद निर्माण करून कळीचा मुद्दा तयार करण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. देशात भाजप सरकार आहे. पंतप्रधान हुकूमशहासारखे काम करीत आहेत. मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसरे कोणीतरी आपली शिकार करीत आहे, हे मराठा बांधवांनी लक्षात घ्यावे. राज्यातील आम्ही सर्व खासदार, आमदार मराठा आंदोलकांसोबतच आहोत. कारण तुम्ही आम्हाला निवडून दिले आहे.
चाकण मराठा मोर्चा आंदोलनाची सर्वाधिक किंमत मला मोजावी लागली आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला हे सर्व करण्यामागे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. त्यांचेच षडयंत्र होते. तत्कालीन पुण्याचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी स्वतः सांगितले की, गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीस यांनी दबाव टाकला होता. गुन्हा अशा पद्धतीचा दाखल केला गेला की ज्यांचा कोणाशी काहीच संबंध नाही. मला दंगलीचा सूत्रधार बनवले. पुढे आंदोलकांना त्रास झाला नाही, परंतू मला त्याचा त्रास सहन करावा लागला.
दिलीप मोहिते हा मराठा क्रांती मोर्चाचाच माणूस आहे’. मला निवेदन देण्यापेक्षा मी तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे यायला तयार आहे. पण तुम्हीच मला बरोबर घेतलं नाही, याची मला खंत आहे. मी तुमचा एक भाग होतो, तुम्ही मला नेले, भाषणे करायला लावली, चाकणच्या उपोषणादरम्यान तत्कालीन चाकण पोलीस निरीक्षकासोबत मी वाद घातला. त्याने पुढे याचा कसा कसूर काढला, याची सर्वांना जाणीव आहे. मी आणि माझ्या पक्षातील सर्व कार्यकर्ते मराठा मोर्चा सोबत सदैव राहतील. मी सर्व नेत्यांना मराठा आरक्षणाबाबत पत्रव्यवहार करणार आहे हा माझा शब्द आहे.
‘समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात ५८ महामोर्चे काढूनही राज्य शासनाने रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली आहे. राज्यातील मराठी माणसे पुढे जातील तेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. हा आमचा आक्रोश आहे. जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर यापुढेही आंदोलने छेडली जातील.’ असे आंदोलक नेते मनोहर वाडेकर यांनी यावेळी सूतोवाच केले.
या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे वामन बाजारे, मनोहर वाडेकर, अमित टाकळकर, रुपाली राक्षे, चेतन शेटे, विठ्ठल पाचारणे, प्रमोद वाडेकर, विजय गोकुळे, अक्षता कान्हुरकर, अशोक मांडेकर, सौरभ दौंडकर आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन वामन बाजारे यांनी केले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.