महाबुलेटीन न्यूज । नाजीम इनामदार
राजगुरुनगर : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव १० विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाला. या अविश्वास ठरावाला न्यायालयीन कोठडीत असलेले सभापती भगवान पोखरकर हे गैरहजर राहिले.
शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव आज प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेला शिवसेनेचे अंकुश राक्षे, ज्योती अरगडे, सुनीता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, मच्छिद्र गावडे हे सात सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे, काँग्रेसचे अमोल पवार तर भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर असे १३ सदस्य उपस्थित होते.
दहा सदस्यांनी सभापती पोखरकर यांच्यावर अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मागील अविश्वास ठरावाच्या बाजूने ११ सदस्यांनी मतदान केले होते. यावेळी १० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. सभापती पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव विशेष सभेला हजर राहून अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करावे, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या सर्व पक्षादेश काढला होता. मात्र आम्ही सहलीवर असल्याने आम्हाला तो प्राप्त झाला नसल्याचे शिवसेनेच्या सदस्यांनी सांगितले.
दरम्यान या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर राजगुरूनगर शहरात कलम १४४ लागू केले होते. पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
● आम्ही शिवसेनेतच, पक्षाचा व्हीप मिळाला नाही : शिवसेनेचे अंकुश राक्षे ( माजी सभापती )
“पक्षीय राजकारण बाजूला ठेवून हे वैयक्तिक राजकारण आहे. महिला सदस्य व इतर सदस्यांवर एक सदस्य जीवघेणा हल्ला करतो, त्यामुळे आमच्यावर हल्ला करणाऱ्यांचे आम्ही समर्थन करणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या संरक्षणार्थ राजकीय सहलीवर होतो. त्यामुळे पक्षाचा व्हीप मिळाला नाही. आमची बाजू आम्ही पक्षाच्या प्रमुखांसमोर मांडू. पक्ष आम्हाला न्याय देईल. पक्षांतराचा आमचा निर्णय नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. तालुक्यात शिवसेनेची मूठ बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
● हा अविश्वास ठराव दबावाने झाला आहे, तालुक्यात हुकूमशाहीची भूमिका आणण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न : काँग्रेसचे अमोल पवार ( माजी उपसभापती )
“मागील वेळी चुकीच्या मुद्द्यांवर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो, त्यानंतर आज पुन्हा अविश्वास ठरावावर मतदान झाले. १० विरुद्द ३ असे मतदान झाले. हा अविश्वास ठराव दबावाने झाला आहे. तालुक्यात पंचायत समिती व खेड बाजार समिती या दोन संस्था चांगल्या कार्यकर्त्यांना राजकारणात पुढे नेणाऱ्या आहेत. मात्र पंचायत समितीमध्ये अविश्वास ठराव आणला आणि बाजार समितीमध्ये सभापतींचे अधिकार काढून घेतले, याच्या मागे मोठे राजकारण आहे. हे कोण करीत आहे ते जनतेला ठाऊक आहे. तालुक्यात हुकूमशाहीची भूमिका आणण्याचा लोकप्रतिनिधींचा हा प्रयत्न आहे.
● शिवसेनेच्या सदस्यांना अविश्वासाच्या विशेष सभेस हजर राहून अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करावे, असा पक्षादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिले होते; मात्र त्यांचा आदेश धुडकावत शिवसेनेच्या ५ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.
● सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर : प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण
प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक कामकाज घेतले. अविश्वास ठरावाला १३ सदस्य हजर होते. अविश्वास ठरावाला १० सदस्यांचे बहुमत असणे आवश्यक होते. त्याप्रमाणे १० विरुद्ध ३ असे मतदान झाल्याने सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.
००००
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
This website uses cookies.