आर्टिकल

बहिणाबाई समजून घेताना…

माझी माय सरसोती
माले शिकवते बोली l

हे एका प्रश्नाचे उत्तर आहे. मग प्रश्न काय होता ?
तो कोणी विचारला ? कोणाला विचारला ? उत्तर कोणी दिलं?असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे उत्तर कवयित्री बहिणाबाई चौधरीने दिलंय. तीची गाणी नेहमी ऐकणाऱ्या तिच्या शेजार-पाजारच्या आयाबायांनी तीला विचारलं,”अगं बहिने, तुला लिवता वाचता बी येत नाय. गाणी मातर किती भराभरा रचतेस? कसं ग जमतं तुला हे?”

त्याला बहिणाबाईने दिलेलं हे उत्तर आहे
तीच्या उत्तरात ती म्हणते ,
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली ll
लेक बहिनाच्या मनी
किती गुपितं पेरली ||

ती सांगते की ,”सरसोती माझी आई आहे.ती मला सारं शिकवते.” गमतीचा भाग बघा तीला सरस्वती ‘शब्दाचा उच्चारही धड करता येत नही. ती ‘सरसोती’ असा उच्चार करते… मात्र तिच्या उत्तुंग प्रतिभेची कमाल तिच्या गाण्यांमधून दिसते.

एकदा ती रोजच्याप्रमाणे शेतात काम करत होती. काहीही करत असली तरी तिचं तोंडाने गाणं चालूच असायचं. गाणं दुसरं कोणाचं नाही तर तिचं स्वतःचच.. म्हणजे गीतकार, संगीतकार, गायिका, सबकुछ बहिणाबाई. तिचं माहेरचा बडेजाव सांगणारं गाणं चालू होतं. स्रियांना माहेर खूपच आवडतं. खरं तर जे अत्यंत प्रिय असतं त्यालाच माहेर म्हणतात. म्हणून तर वारकरी सांप्रदायातील संत मंडळी पंढरपूरला माहेर म्हणतात.

माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी |
खरं तर पुरुषांना माहेर नसतं. परंतु आत्यंतिक आवडीच्या गोष्टीला उपमा देण्यासाठी ‘माहेर’ या शब्दाशिवाय दुसरा योग्य शब्द मराठी भाषेत नाही.

माझ्या माहेराच्या वाटे
जरी लागल्यारे ठेचा |
वाटंवरच्या दगडा
तुले फुटलीरे वाचा |

तिच्या माहेरच्या वाटेवरचा तीला दगड म्हणतो,
हळू जाय माय बाई ।
नको करू धडपड !
हिच्या माहेरच्या वाटेवरचा दगड तीला ठेच लागू नये, म्हणून तीला हळू चालायला सांगतो. या गाण्याच्या तालावर तिचं शेतात काम चालू होतं. त्यावेळी त्या शेताच्या बांधावरील झाडाखाली
एक योगी ध्यानाला बसला होता. हिच्या गाण्यामुळे त्याच्या ध्यान-धारणेत व्यत्यय येत होता. तो चिडून तिच्यावर खेकसला, ” मी इथं ध्यानाला बसलोय. बंद कर तुझी ही वटवट. काय लावलंय हे माहेरचं पुराण? तुला जर माहेर एवढं आवडत होतं, तर मग सासरी कशाला आलीस? आता योग्याच्या या प्रश्नाला अशिक्षित बहिणाबाई काय उत्तर देणार? असं आपल्याला वाटेल. पण बहिणाबाईने योग्याला दिलेलं उत्तर ऐकून योगी गप्प तर झालाच पण थक्कही झाला. त्याची बोलतीच बंद झाली. तीने त्याला सुनावलं,
अरे लागले डोहाये (डोहाये-डोहाळे )
सांगे शेतातली माटी | ( माटी -माती )
गाणं माहेराचं गाते
लेक येईनरे पोटी |
देरे देरे योग्या ध्यान
ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते |

जगातील सर्व मातांची प्रतिनिधी म्हणून तीने दिलेलं हे उत्तर होतं. यावरून तिच्या प्रतिभेची उंची लक्षात येते.
तिच्या उत्तुंग प्रतिभेचा प्रत्यय तिच्या गाण्यांमध्ये पदोपदी येतो. आता हेच पहाना, एका गाण्यात ती म्हणते ,
अरे जोडता तोडलं
त्याले नातं म्हनू नही |
ज्याच्यातून पीठ येतं
त्याले जातं म्हनू नही |
जात्यातून पीठ येतं. पीठ येतंना मग त्याला जातं का म्हणता? असा प्रश्न ती विचारते.

बहिणाबाईंची फक्त 52 गाणी उपलब्द्ध आहेेेत. तीनेे या गाण्यांतून जीवनाचे फार मोठे तत्वज्ञान सांगितले आहे. तेही अगदी सोप्या भाषेत. शेतकरी कुटुंबातील एक अशिक्षित स्त्री. तिचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी 11 ऑगष्ट 1880 रोजी महाजन या सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्याकाळात ग्रामीण भागातील लोकांना शिक्षणाचं महत्व फारसं वाटत नव्हते आणि शाळाही फार कमी होत्या. स्रियांनी शिक्षण घेण्याला समाजमान्यताही नव्हती. फुले दाम्पत्याने स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. तरी मुलींच्या शिक्षणाबाबत फारशी जागृती झाली नव्हती. त्यामुळे ती निरक्षरच राहिली.

वयाच्या 13 व्या वर्षी ती लग्न होउन जळगावातील नथू चौधरी यांचे घरी आली. घरी आठरा विश्व दारिद्र्य. ऐन तारुण्यात वयाच्या 30 व्या पतीचं निधन झालं. नियतीला हे दुःख कमी वाटलं की काय तिच्या दोन मुलांपैकी एका मुलाचंही निधन झालं. दुःखाचा डोंगरच कोसळला. एव्हढ्या मोठ्या संकटांनी कोणतीही सामान्य स्त्री कोलमडून पडली असती. पण बहिणाबाई खचली तर नाहीच उलट पदर खोचून आपल्या लेकरासाठी कामाला लागली. समाजातील अनेक व्यथा तीने तिच्या गाण्यात मांडल्या. अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल खेद व खंत व्यक्त करून कडाडून हल्लाही चढवला. मात्र आपल्या स्वतःच्या दुःखाबद्दल ब्र शब्दही तिनं तिच्या गाण्यात कुठंही काढला नाही. उलट तिचं सांत्वन तीच करते. ती म्हणते,
रडू नको माझ्या जिवा
तुला रड्याचीरे सवं |
रडू हसवरे जरा
त्यात संसाराची चव ||
ती स्वतःच तिच्या जीवाला समजावते.

संकटांना ती धीराने सामोरी जाते. कोणत्याही ज्योतिषाकडं ती गेली नाही. तिचा असल्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. एकदा एक फिरस्ता ज्योतिषी तिच्या घरी आला होता. त्याला तिने अक्षरशा पिटाळून लावले. ती त्याला म्हणाली,
बापा नको मारू थापा
असो खऱ्या असो खोट्या l
नही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोट्या ll (तयहात – तळहात )
नकॊ नकोरे ज्योतिषा
नको हात माझा पाहू |
माझं दैव माले कये (कये – कळे )
माझ्या दारी नको येऊ ||

दुःख, दारिद्र्य व दुर्दैवी आघाताने गांजलेल्या, पिडलेल्या अभागी बहीणाबाईने काढलेले हे उदगार विचार करायला लावणारे आहेत. अशिक्षित व शेतकरी कुटुंबातील असूनही अंधश्रद्धा झुगारून देणारी बहिणाबाई आधुनिक विचाराची होती हे यावरून लक्षात येतं. तेही 100-125 वर्षापूर्वी.

बहिणाबाईला निसर्गकन्या म्हणतात .
निसर्गावर तिनं भरभरून प्रेम केलं.
ती पांडुरंगाला म्हणते ,
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता भागवत |
पावसात समावत
माटीमधी उगवतं ||

मातीत झाड उगवलेलं पाहिल्यावर ती दोन्ही हात जोडते आणि म्हणते ,
अरे देवाचं दर्सन (दर्शन )
झालं झालं आपसुक |
हिरिदात सूर्या बापा
दायी अरुपाचं रूप ||

मातीतून उगवणाऱ्या रोपाला पाहून ती
पांडुरंगाला म्हणते, “पांडुरंगा, तू निर्गुण, निराकार आहेस. झाडाच्या रूपात तू मला प्रत्यक्ष दर्शन दिलेस. ती झाडाला देव मानते. माती आणि पाणी हे तिचे गीता आणि भागवत आहे.

बहिणाबाईंची गाणी जुन्यात चमकणारी आणि नव्यात झळकणारी आहेत. साध्या व सोप्या भाषेत उच्च कोटीचं तत्वज्ञान सांगणारी ती महान कवयित्री होती. शेत, बैल,औत, मोट, जातं, चूल यांच्या माध्यमातून जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान तीने आपल्या गाण्यातून सांगीतलंय. एक निरक्षर स्त्री साहित्याच्या क्षेत्रात इतकी अनमोल कामगिरी करू शकते, हे असत्य वाटणारं सत्य आहे.

बहिणाबाईला लिहिता-वाचता येत नसल्यामुळे तीची गाणी तीचा मुलगा सोपानदेव यानें त्याला शक्य झालं तेवढी लिहिली. ती फक्त 52 गाणी आहेत. तिची सगळी गाणी संग्रहित करता आली असती, तर मराठी भाषा अधिक समृद्ध झाली असती; हे सांगण्यासाठी जोतिषाची गरज नाही.

सोपानदेव चौधरी एकदा प्र.के.अत्रे यांना भेटायला गेले होते. सोपानदेवांनी आपल्या आईची ही हस्तलिखित गाणी त्यांना दाखवली. बहिणाबाईंच्या गाण्यांनी ते अक्षरशा भारावून गेले. प्र.के.अत्रे यांच्या प्रेरणेतून ‘बहिणाईची गाणी’ हे पुस्तक 1952 साली प्रकाशीत झालं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरीचं नाव दिलंय. एका निरक्षर ग्रामीण शेतकरी साहित्यिक महिलेचं नाव एका विद्यापिठाला दिलं जाणं, हे जगातल्या सात आश्चर्यानंतरचं आठवं आश्चर्य आहे. तिच्या फक्त 52 गाण्यांचा हा प्रताप आहे. ही अलौकिक प्रतिभावंत निसर्ग कन्या 3 डिसेंबर 1951 रोजी ती अनंतात विलीन झाली.

पी .टी .शिंदे
राजगुरूनगर, रानमळा
ता. खेड, जि. पुणे. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.