शिवाजी आतकरी
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
खळखळून हास्यकल्लोळ कानावर पडला. त्यामुळे पाय आपसूक त्या वर्गाकडे वळाले. वर्गात प्रवेश केला. विद्यार्थी आपापल्या जागी बसले होते. एकमेकांना टाळ्या देत ‘मिळून ते सर्व’ हास्यकल्लोळात बुडाले होते. पहिल्याच दिवशी ती शाळा आणि तो वर्ग मला भावला आणि त्या वर्गाचा दांडी मारणारा मी एक विद्यार्थी बनलो. कधीतरी रविवारी मी त्या शाळेत हजेरी लावत असे. त्या वर्गातून मिळणाऱ्या चार भिंतीच्या पलीकडच्या शिकवणीचा आणि अनुभवाचा मी लाभार्थी बनलो. त्या शाळेचा आणि मातब्बर विद्यार्थी असलेल्या वर्गाचा दांडी मारणारा किंबहुना कधीतरी हजेरी लावणारा विद्यार्थी म्हणून मलाही अभिमान होता. साधारण वीस वर्षांपूर्वी मी दाखल झालेलो ती शाळा….
ख्यातनाम डॉक्टर व राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल खिंवसरा यांच्या क्लिनिकमधील ती खोली. ‘विचारांची खोली’ असलेले अनेक विद्यार्थी तेथे जमायचे. आठवड्याने ती शाळा दर रविवारी तेथे भरायची. मग त्या चार भिंतीतल्या शाळेत भिंती बाहेरील सर्वदूर विषय रंगायचे. चर्चा व्हायची गल्लीपासून दिल्लीपर्यंत….. आणि अगदी आंतरराष्ट्रीय राजकारणावर, अर्थकारणावर, समाजकारणावर…. तेथे विविध विषयांचा ऊहापोह व्हायचा. त्या सर्वांग सुंदर चर्चेत वाद-विवाद व्हायचा. मतभेद तेथे दिसायचे; मात्र विद्यार्थ्यांमध्ये मनभेद कधीही जाणवला नाही. त्या चर्चेत विविध विषयांवर आपली मते मांडली जात. एकमेकांच्या मतांचा आदर करत त्यावर विरोधही नोंदवला जात. एखाद्या विषयावरून खिल्ली उडवली जात ; मात्र त्यात उंची असे. विनोदाची झालर त्याला असे. त्यामुळे नर्मविनोदी वातावरण या शाळेत पाहायला मिळे. शाळेच्या विद्यार्थ्यांना उंची होती. त्यामुळे तेथील विषयाला दर्जा असायचा. विद्यार्थी तसे खोडकरही होते. विविध क्षेत्रातील मातब्बर विद्यार्थी ते. एकमेकांची मात्र चांगलीच खेचायचे! त्यात नर्मविनोदी भाव असल्यामुळे त्यालाही दर्जा असायचा. एकंदरीत काय की त्या शाळेत धम्माल विद्यार्थी अन हास्याची कारंजी….! अपवाद सोडला तर सर्वच जेष्ठ आणि विविध क्षेत्रातील श्रेष्ठ! त्यात डॉक्टर होते, प्राध्यापक होते. कोणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते तर कुणी संचालक! कोणी ख्यातनाम व्यापारी होते तर कुणी वकील. इतकेच काय बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञही होते. दिगग्ज विद्यार्थ्यांची ती शाळा होती…
ही शाळा आधार वाटायची. या आगळ्या वेगळ्या शाळेला आठवायचे कारण ती शाळा आता भरत नाही. त्या वर्गाला सारेच मुकले आहेत. रविवारची ती शाळा बंद झाली. वर्ग बेसूर मुका झाला आहे. शाळेतील शांतता अतिक्लेशदायी भासू लागली आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थी सर्व सहकाऱ्यांना मागे सोडून पुढच्या वर्गात निघून गेला. त्या विद्यार्थ्याचे असे हे अचानक सोडून जाणे सर्वांनाच वेदनादायी झाले. त्यामुळे वर्गातील हास्य कायमस्वरूपी संपले… हास्याची कारंजी उडवणारी, विनोदाची मनोरे रचणारी ती शाळा आता मात्र मुकी झाली आहे.
महाविद्यालयात पुस्तकाचा आधार न घेता शिकवणारे, राज्यशास्त्र या विषयाची पुस्तके लिहिणारे, बँकिंग क्षेत्रातील गाढा अभ्यास असणारे एकूणच अष्टपैलू व्यक्तिमत्व, कोणाचा सच्चा मित्र तर कोणाचे मार्गदर्शक प्रा. पांडुरंग होले…. सर काळाच्या पडद्याआड गेले. काही घटना, प्रसंग शब्दबद्ध करू नये, हेच खरे. कारण अव्यक्त किंबहुना मौन जास्त आशय सांगून जाते. ‘गमावले’…..होय, आपण गमावून बसलोय सरांना… हा विद्यार्थी पुढच्या वर्गात गेला आणि शाळा मुकी झाली…
त्या बहुआयामी शाळेतील राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल खिंवसरा, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, प्रख्यात डॉक्टर प्रदीप शेवाळे, बँकिंग क्षेत्रातील तज्ञ शरद (आबा) गुजर व नारायण फडके, उद्योजक प्रदीप लुणावत, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजित लुणावत, व्यावसायिक लालाशेठ कर्नावट, प्रकाश भन्साळी, दिलीप भोर, दिलीप गुगळीया, पंचायत समितीचे माजी सदस्य यशवंत घुमटकर, पत्रकार शिवाजी आतकरी हे विद्यार्थी…आपल्या सहकाऱ्यास या सर्वांनी गमावले. मुक्या झालेल्या शाळेतील ते विद्यार्थीही निशब्द….
———-
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.