उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य असूनही महाविकास आघाडी तसेच महायुतीतील जागावाटपाचे त्रांगडे अजून सुटलेले नाही. तारीख पे तारीख असे चालू आहे. काही मतदारसंघ तर अजून कोणत्या पक्षाला याचे कोडे उलगडायला तयार नाही. परस्परांना अजमावण्याचे आणि कोणाचे उपद्रवमूल्य जास्त याची गणिते मांडली जात आहेत. लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघाचा आणि किमान सात-आठशे गावांचा असतो. या मतदारसंघात संपर्क साधण्यासाठी अवधी फार कमी मिळतो. त्यात नवीन उमेदवार असेल, तर गोष्टच न्यारी. असे असताना पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास काहीच दिवस शिल्लक असताना उमेदवारी आणि जागावाटपाचे राजकीय पक्षाचे गुऱ्हाळ काही केल्या थांबायला तयार नाही. मतदारसंघावरचे दावे सोडायला कुणी तयार नाही. काही ठिकाणी मतदारसंघ तर काही ठिकाणी उमेदवार बदलण्यासाठी मित्रपक्षांचा दबाव येत आहे. आता दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. लोकसभेच्या ४८ जागांचे गणित समोर ठेवून महायुती आणि महाविकास आघाडीने लढतीची जय्यत तयारी केली असली, तरी दोन्हीकडेही नाराजी, बंडाची निशाणे फडकावली जात आहेत. दोन राजकीय पक्ष फोडूनही गेल्या वेळच्या ४१ जागा टिकवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे, तर पक्ष फुटीनंतरही महाविकास आघाडीच्या जागा वाढवण्याचे किंबहुना आहे त्या टिकवण्याचे आव्हान महाविकास आघाडीपुढे आहे. लोकसभा निवडणुकीत देशापुढचे प्रश्न चर्चिले जाण्याऐवजी गल्लीतल्या प्रश्नांचीच जास्त चर्चा होत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांत विदर्भ आणि मराठवाड्यात खरी लढत आहे. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस अशी लढत होणारे मतदार संघ मराठवाड्यात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर भाजप आणि शिवसेनेचे प्राबल्य होते. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद होती. कोकण आणि मुंबईत शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या अडीच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. बहुतांश आमदार, खासदार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. अजित पवार यांच्याकडे लोकसभेचा एकच खासदार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकसभेचे पाच सदस्य आहेत, तर शरद पवार यांच्याकडे तीन सदस्य आहेत. भाजपचे २३ सदस्य होते. या पार्श्वभूमीवर भाजप आणि महायुतीने ४५ प्लस चे स्वप्न पाहिले आहे. भाजपने दोन पक्ष फोडूनही त्याचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्याने सव्वा दोन टक्के मते असलेल्या मनसेला सोबत घेण्याचे घाटते आहे. या पक्षाला किती जागा सोडणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातही शिंदे गटाच्या जागांवर गंडातर येण्याची शक्यता आहे.
उमेदवारी देताना भारतीय जनता पक्षाने नव्या जुन्यांची सांगड घातली आहे. २३ जागांवरचे उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाला मात्र नव्या जुन्याची सांगड घालता आलेली नाही. ठाकरे यांच्या पक्षाला अनेक ठिकाणी नवे उमेदवार देता आले. अजित पवार यांच्या पक्षाला हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा असल्या, तरी त्यांना सुनील तटकरे वगळता सर्वंच उमेदवार नवे देता आले. शरद पवार यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी तीन जागा वगळून उर्वरित जागांवर नवे चेहरे देता आले. विदर्भात मतदानाची तारीख जवळ येत असली, तरी अजून काही मतदारसंघाचा पेच सुटलेला नाही. रामटेक हा नागपूरशेजारचा मतदारसंघ. हा मतदारसंघ भाजपला हवा होता; परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाने या मतदारसंघावरचा हक्का सोडला नाही; परंतु भाजपने उमेदवार बदलायला शिंदे गटाला भाग पाडले. काँग्रेसचे आ. राजू पारवे यांना शिवसेनेतून आणून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे समर्थक नाराज झाले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने तिथले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश साखरे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वें यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथील काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती; परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता असून बंडखोरीचा फटका महायुतीला, की महाविकास आघाडीला बसतो, हे निवडणुकीनंतरच कळेल. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे; मात्र निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. लोकसभेसाठी इच्चुक असलेले काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार नसलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने बळजबरीने घोड्यावर बसवले. या मतदारसंघातून काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न होता; परंतु त्यांनी नकार दिला. त्यांनी कन्या शिवानी हिच्यासाठी आग्रह धरला; परंतु त्यांना उमेदवारी न देता धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. आता वडेट्टीवार यांची नाराजी कशी दूर करायची, हा प्रश्न आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत कौर यांना उमेदवारी देण्यास भाजप, शिंदे गट, आ. बच्चू कडू अशा सर्वांचा विरोध आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे; मात्र त्याचवेळी आघाडीतील घटक पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. बुलडाणा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त करत बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विद्यमान खा. प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा भाजप कार्यकर्ते प्रमोद पोहरे यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे; पण शिवसेना शिंदे गटाकडून पाच वेळा विजयी झालेल्या खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीवर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब झालेले नाही.
मराठवाड्यात लोकसभेचे आठ मतदारसंघ असून, छत्रपती संभाजीनगरची एक जागा वगळता तिथेही सातही खासदार शिवसेना-भाजप युतीचे होते. आता तिथे दोन खासदार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे,शिंदे गटाचा एक, भाजपचे चार तर एमआयएमचा एक खासदार आहे. असे असताना छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या शिंदे गटाच्या वाट्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक, तर उर्वरित चारही जागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार उभे राहणार आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्याने नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांचा फायदा होईल, असे सांगितले जाते. उत्तर महाराष्ट्रात एकूण आठ मतदारसंघ आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. भाजपला सहा, शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. उत्तर महाराष्ट्रात कांदा आणि द्राक्षांसह अन्य पिकांचे भाव हा आता तेथे कळीचा मुद्दा झाला आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उत्तर महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातून गेली. भाजपने बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत; परंतु धुळे, रावेर, नगर आणि जळगाव या चार लोकसभा मतदारसंघात भाजपतील अंतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत लाथाळ्या सुरू आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाकडे हा मतदारसंघ आहे. हेमंत गोडसे सध्या तिथले खासदार आहेत; परंतु या मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दावा केला आहे. गोडसे समर्थक आणि भाजपच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी वेगवेगळी शक्तीप्रदर्शने केली. सातारा मतदार संघ खा. उदयनराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून घेऊन त्या बदल्यात नाशिक लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाला दिला जाऊ शकतो. तसे झाले, तर छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ यांना इथून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यानी येथे सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. उमेदवार कुणीही असले, तरी गिरीश महाजनविरुद्ध एकनाथ खडसे असाच सामना होत असतो.
पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीचे जाळे आहे. संस्थात्तम नेटवर्क असल्याने या भागात शरद पवार यांचे वर्चस्व होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने त्यांची शक्ती विभाजित झाली आहे. तीच गत शिवसेनेची. भाजपने अनेक नेत्यांना आयात करून ताकद वाढवली. सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने डबल केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याचे घाटत होते. आता काँग्रेसची नाराजी कशी दूर करायची, हा प्रश्न आहे. मुंबई आणि कोकण परिसरातील मतदारसंघ आतापर्यंत शिवसेनेचे बालेकिल्ले होते. पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद होती. कल्याण, डोंबिवली परिसरात भाजपचे वर्चस्व होते; परंतु मुंबईवर अनभिषिक्त सत्ता होती, ती शिवसेनेची. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचाही आता परिणाम संभवतो. शिंदे गटाची ताकद किती आहे, याबाबत साशंकता असल्यानेच मनसेला भाजपने जवळ केले असावे. शेवटच्या टप्प्यात येथे निवडणूक असल्याने या परिसरातील १२ मतदारसंघात अजून जुळवाजुळव सुरू आहे.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.