गणेशोत्सव

अग्रलेख : विघ्नहर्त्या – तूच सावर रे आता!

अग्रलेख : विघ्नहर्त्या – तूच सावर रे आता!
———————————————–

गणनायका,

तुझा उत्सव आजपासून सुरू होतो आहे. तू गणांचा म्हणजे जनांचा नायक आहे. तुला भक्तांसोबत राहायला आवडतं. तू भक्तांचा लाडका आहे. तुझ्या उत्सवाला अमाप गर्दी लोटते; परंतु या वर्षी गणांच्या नायका, तुला भक्तांचा विरह सहन करावा लागणार आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप दिलं. त्यांनी या उत्सवाचा वापर प्रबोधन आणि ब्रिटिशांविरोधात लोकांना एकत्र करण्यासाठी केला; परंतु या वर्षी लोकांना एकत्र यायलाच बंदी आहे. त्याचं कारण कोरोनाचा प्रसार. या संसर्गजन्य आजारानं लाखो लोकांना अंथरुणाला खिळवून ठेवलं आहे. काहींचे बळी घेतले आहेत. एकतर कोरोनावर ठरावीक आैषध नाही. त्यावर अजून लस नाही. अशा परिस्थितीत लोकांनी गर्दी करणं टाळलं पाहिजे. त्यासाठी गजानना, तूच लोकांना आता घरातून बाहेर पडू नये, अशी सद्‌बुद्धी दे रे बाबा! पूर्वीच्या काळी लोकांना बाहेर पडण्यासाठी निमित्त हवं होतं. आपले विचार लोकांपर्यंत पोचविण्याची साधनं मर्यादित होती. आता तसं राहिलेलं नाही. गणेशोत्सवातील सजावटी, देखावे आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. त्यासाठी दहा दिवस रस्ते गर्दीनं फुलून जातात. आता बाहेर पडण्यावरच बंधनं आली आहेत. असं असलं, तरी गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवातील देखावे, सजावटी विविध वाहिन्यांवरून दाखविण्याची सोय झाली आहे. मिरवणुकांचंही थेट प्रक्षेपण होत असल्यानं नागरिकांना तसंही बाहेर पडण्याची गरज आता पूर्वीइतकी राहिलेली नाही. या वर्षी तर सरकारच्या आवाहनाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, तो नक्कीच स्वागतार्ह आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सर्वंच सार्वजनिक उत्सव, यात्रा, मंदिरं बंद आहेत. त्यातच सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढतं आहे. अशा पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर भान पाळायचं असेल, तर घरातून बाहेर पडणं टाळायलाच हवं. एरव्ही प्रत्येक गणेशोत्सवात मंडळांच्या कार्यकर्त्यांविरोधात वर्गणी, खंडणीच्या तक्रारी होत असतात. रस्त्यात मंडप टाकल्यानं नागरिकांच्या शिव्या-शापांचं धनी व्हावं लागत असतं; परंतु त्याच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे निर्णय घेतले, जो समंजसपणा दाखविला, त्याचं स्वागत करायला हवं. उठसूठ टीका करणा-यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी संकट काळात घेतलेली भूमिकाही लक्षात घ्यायला हवी. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून सुरू असलेल्या प्रस्थापित गणेशोत्सवांचं नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केलं. हिंदूच्या घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे; पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणा-या सामाजिक महोत्सवाचं स्वरूप दिलं. या उत्सवाच्या निमित्तानं भारतातील जनता एकवटेल. त्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या रुपानं तिच्यात जनजागृती निर्माण करता येईल. आपली संस्कृती आणि धर्म याबाबत तिच्या मनात नवी अस्मिता जागृत होईल, अशी ही भावना लोकमान्य टिळकांच्या मनात होती. सर्व भारतीय लोकांनी आप-आपसातील मतभेद सोडून एकत्र यावं, ही लोकमान्य टिळकांची इच्छा होती.

हे लंबोदरा,

लोकमान्य टिळकांची ही इच्छा फलद्रुप झाली. महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित म्हणून गणेशोत्सवाकडं पाहिलं जातं. आता गणेशोत्सव महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. जगभरात गणेशोत्सव पोचला आहे; परंतु या वर्षी केवळ महाराष्ट्रातच कोरोना आहे, असं नाही,तर तो जगात पोचला आहे. त्यामुळं सर्वंच धर्मियांना सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे. गणपती हे बुद्धीचंही दैवत. त्यामुळं हेच दैवत आता राज्याला या संकटातून बाहेर काढण्याची दिशा देईल, अशी अपेक्षा बाळगली, तर त्यात वावगं काहीच नाही. सर्वांत अगोदर लालबागच्या राजानं गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय सर्वांत अगोदर घेतला. काही आगलाव्या मंडळींनी त्यावर आक्षेप घेतला, तरी त्यांच्याकडं दुर्लक्ष करून पुढं जाणं हेच महत्त्वाचं आहे. लालबागच्या राजानं यापूर्वीही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. आताही लालबागच्या राजानं प्लाझ्मा दान चळवळ सुरू केली. मुंबई, पुणे, नगर अशा सर्वंच गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा पुढाकार घेतला आहे. सामाजिक उपक्रमांवर मंडळांनी भर दिला आहे. एरव्ही जी मंडळं अड्डेलतट्टूपणाची भूमिका घेत, तीच मंडळं आता सामंजस्याची भूमिका घेतली. काही मंडळांनी आडमुठी भूमिका घेतली असली, तरी त्यांची ही भूमिकाही दूर होईल. नागरिकांनीही आता घरातून बाहेर पडण्याचं टाळलं पाहिजे. घरात बसून सरकार आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. मु्स्लिमांनी ईद साध्या पद्धतीनं साजरी करून प्रशासनाला सहकार्य केलं, तीच जबाबदारी आता हिंदू धर्मियांची आहे. अर्थात यापूर्वी आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायानं तसा सामंजस्यपणा दाखविला होताच. कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेनं याबाबत अतिशय समंजसपणाची भूमिका घेतली आहे.

हे वक्रतुंडा,

कोरोनामुळं केवळ धार्मिक दरवाजेच बंद झालेत असं नाही, तर इथली अर्थव्यवस्था संकटात आहेत. कोरानामुळं लावलेल्या टाळेबंदीमुळं बेरोजगारी वाढली आहे. सीएमआयई या संस्थेनं गेल्या दोनच दिवसांपूर्वी दिलेल्या अहवालात बेरोजगारीचा दर दहा टक्क्यांच्या जवळ पोचल्याचं म्हटलं आहे. जागतिक बँकेच्या कालच प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारताच्या आर्थिक विकासापुढचं आव्हान लक्षात आणून दिलं आहे. राज्यं आणि केंद्राचंही उत्पन्न घटल्यानं सरकारची मोठी कोंडी होत आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली आहे. तू हे सारं पाहतो आहेस ना बाबा! लोकांनी जगायचं कसं, हाच खरा मोठा प्रश्न आहे. नोकरी गेली, व्यवसाय बंद, असं सहन करण्याची क्षमताच लोकांमध्ये राहिली नाही. अशा हताश कुटुंबांनी काळोखाची वाट धरली. अजूनही किती लोक या वाटेवरून जायला तयार आहेत, याची गणतीच नाही.

हे महोदरा,

तुझ्या हे लक्षात येतंच असेल म्हणा! सध्याच्या या संकटाच्या काळात लोकांना धीर दे. जगण्याचं बळ दे. संकटातून सावरण्याचं धैर्य त्यांना दे. राज्य आणि केंद्रातील सरकारमधील धुरिणांना जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची सद्‌बुद्धी दे. ठप्प झालेलं जग पुन्हा धावलं पाहिजे. त्याच्या पायात धावण्याचं बळ दे. चुकणा-यांचा कान पकड. अशा संकटकाळातही स्वतः पुरतं पाहणा-यांना चांगलीच अद्दल घडव. लोक घरीच थांबणार असल्यानं आणि ‘दो गज दुरी’ चा नियम पाळणार असले, तरी लोकांचं परस्परांवरील प्रेम, आदर कमी होता कामा नये. देशातील एक टक्का कोट्यधीशांना आपल्या काही संपत्तीतील वाटा गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्च करण्याची बुद्धी त्यांना दे. संकटात कामगारांचं शोषण करणा-या कंपन्यांच्या मालकांना तू चांगलीच अद्दल घडव. लोकांच्या अपेक्षा फार आहेत. त्या कुणीही पूर्ण करणार नाही. करू शकणार नाही, हे खरं असलं, तरी किमान हाता-तोंडाची गाठ पडावी आणि हाताला कामं मिळावं, एवढी तरी माफक अपेक्षा पूर्ण करावी, अशी हे अपेक्षा केली, तर हे जगन्नियत्या तुला ते नक्कीच अशक्य नाही. तुझं उदर मोठं आणि लांब आहे. तुझ्या या भक्तांचं काही चुकत असेल, तर त्यांचे गुन्हे पोटात घे. त्याला माफ कर आणि कोरोनाच्या या संकटातून मात करण्याची शक्ती त्याला दे. जगावरचं हे संकट दूर कर आणि अर्थव्यवस्थेची चाकं गतिमान कर. तसं झालं, तर सर्वंच समस्यांतून मार्ग काढला जाईल. तू विघ्नहर्ता आहेस. त्यामुळं तू सध्याची विघ्नं दूर कर रे बाबा!

भागा वरखडे

MahaBulletin Team

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

3 days ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

2 weeks ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

3 weeks ago

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…

4 weeks ago

दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…

4 weeks ago

This website uses cookies.