शैक्षणिक

शिक्षक दिन विशेष : येथे कर माझे जुळती !

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : मानवी जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व आहे. शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे. ज्यामुळे मानवाचा सर्वांगीण विकास होतो त्याला शिक्षण म्हणतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण. समाजाचं भवितव्य सुशिक्षित लोकांच्या हातात असतं. म्हणजेच शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या हातात असतं, म्हणून शिक्षक दिनामित्त हा लेखन प्रपंच …

ग्रामीण भागात विशेषतः दुर्गम खेड्यांमध्ये शिक्षण प्रक्रिया प्रभाविपणे होत नाही, कारण
1) दुर्गम भागात जाण्यासाठी शिक्षक नाराज असतात.
2) बहुतेक कामचुकार, नाठाळ, निष्क्रिय शिक्षकांना शिक्षा म्हणून दुर्गम भागात पाठवले जाते. जे शिक्षक नागरी भागातील सोयीच्या ठिकाणी चांगलं काम करत नाहीत ते गैरसोयीच्या ठिकाणी काय दिवे लावणार?
3) दुर्गम भागात शैक्षणिक सोयी-सुविधांचा व साधनांचा अभाव असतो .
4) पालक अशिक्षित व निरक्षर असतात. त्यामुळे ते
पाल्याच्या शिक्षणासाठीसाठी घरी काहीच करू शकत नाहीत.
5) प्रशासनातील पदाधिकारी आणि अधिकारी यांचं या भागाकडे दुर्लक्ष असतं आणि परिणामकारक वचक नसतो.
6) या भागातील लोकजीवन अत्यंत कष्टाचं आणि कमालीचं हलाखीचं असतं. ज्यांच्या पुढं उद्याच्या भाकरीचा प्रश्न असतो, त्या लोकांच्या मनात त्यांच्या पाल्याबद्दल पुढच्या 20-25 वर्षासंबधीचा विचार येणे शक्यच नाही.

अशा दुर्गम भागातही काही शिक्षक खूपच उल्लेखनीय काम करतात. प्रातिनिधिक स्वरूपात काही अत्यंत बोलकी उदाहरणे पुढे देत आहे ….
यांच्याशिवाय आणखीही कितीतरी शिक्षक अत्यंत उत्कृष्ट काम करतात. सगळ्यांबद्दल इथं लिहिणं शक्य नाही ….

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुकयातील ‘ सामोडे ‘ ‘गावाच्या भिल्ल समाजातील अत्यंत गरीब पण बुद्धिमान ‘राजेंद्र भारूड ‘ हा मुलगा प्राथमिक शाळेत शिकत असताना त्याच्या शिक्षकाने या मुलाची हुशारी पाहून ‘नवोदय विद्यालयात’ प्रवेश मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. आईच्या पोटात असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. आईचा हातभट्टीच्या दारूचा धंदा. अशा विचित्र परिस्थितीतही त्याने शिक्षकाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचं सोनं केलं. तो एम.बी.बी.एस. झाला आणि त्याच वर्षी तो पहिल्याच प्रयत्नात U. P. S. C. ची परीक्षा देऊन कलेक्टरही झाला. हे एका शिक्षकांमुळेच घडले. हे शिक्षक त्याच्या आयुष्यात आले नसते तर हा राजेंद्रही गावठी दारूचा वडिलोपार्जित धंदाच करीत बसला असता..

4 वर्षांपूर्वी आदर्श विद्यालय शिरोली (ता.खेड, जि.पुणे ) या शाळेत मला एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं. एका सामान्य, खरं सांगायचं तर अति सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने एम.पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवलं आणि तिची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत निवड झाली, म्हणून तिचा सत्कार या शाळेने व शिरोली ग्रामस्थांनी आयोजित केला होता. त्या संस्थेचे संस्थापक सचिव कल्याण देखणे यांनी मला बोलावलं होतं.

मी वेळेत शाळेवर पोहोचलो. शाळेच्या समोर एक मुलगी व 2-3 लोक उभे होते. मी गाडीतून उतरलो. त्या मुलीने व तिच्या बरोबरच्या लोकांनी मला नमस्कार केला. ज्या मुलीचा सत्कार होता तीच मुलगी होती ती. गप्पांच्या ओघात तिच्या यशाबद्दल चर्चा केली. ती म्हणाली ,” तुम्हाला टाकळकर बाई माहिती आहेत का ? त्यांचं सासरचं आडनाव आहे ‘ चिखले ‘. मी म्हणालो , ” हो. त्यांचं काय ? ” ती म्हणाली ,” होलेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतील श्रीमती टाकळकर ( चिखले ) बाईंच्या वर्गात माझं इ .7 वी पर्यंतचं शिक्षण झालं. शिष्यवृत्ती परीक्षेची त्यांनी उत्तम तयारी करून घेतली. माझा पाया त्यांनी भक्कम करून घेतला. त्यामुळेच मी एमपीएससी परीक्षेत यश मिळवू शकले. ” तिच्या यशाचं सगळं श्रेय तीने आपल्या शिक्षिकेला दिलं. सायली टाव्हरे तिचं नाव. विद्यार्थी घडवण्यामध्ये, त्याचं जीवन फुलवण्यांमध्ये शिक्षकाच्या योगदानाचं किती महत्व आहे हे यावरून लक्षात येतं.

वर्गातील मुलांना शिकवणं हे शिक्षकाचं काम. त्या कामा बरोबरच आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी त्या गुरुजींनी भिल्लाच्या त्या पोराला योग्य मार्गदर्शन केले.

तसेच श्रीमती टाकळकर ( चिखले ) बाईंनीही देशाला एक आदर्श अधिकारी दिला. वास्तविक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेत असताना अनेक शिक्षकांनी या दोन्ही विद्यार्थ्याना शिकवलं असेल. वेगळ्य्या वाटेने जाऊन आणि झोकून देऊन अतिशय तळमळीने काम करणारे असे अनेक शिक्षक आहेत.

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील डिंगोरे या गावातील श्री .संजय डुंबरे या प्राथमिक शिक्षकाची बदली झाली. त्यांची बदली रद्द करण्यासाठी लोकांनी आपली मुले शाळेतून घरी आणली. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन डुंबरे गुरुजींची बदली रद्द होईपर्यंत शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेतला व तो तडीस नेला. संपूर्ण गाव एका शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी ग्रामसभेत आंदोलनाचा ठराव मंजूर करतं. हे त्या शिक्षकाला मिळालेलं जगातील सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं पारितोषिक असूच शकत नाही.

टाकळकरवाडी (ता.खेड,जि.पुणे ) या गावातील गावकरी दरवर्षी गुणवंत शिक्षकांचा सोन्याची आंगठी देऊन गौरव करतात. वीतभर जमिनीसाठी बांध कोरणारे, सख्या भावाला कोर्टात खेचणारे किंवा खून करणारे लोक ज्या समाजामध्ये आहेत त्याच समाजातील ही मंडळी नातं, जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता असा कोणताही संकुचित विचार मनात न आणता गुणी शिक्षकांचा भव्य-दिव्य सन्मान करून आदर व्यक्त करतात. हे समाजाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक प्रगतीचं लक्षणच नाही काय ?

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये पिंपळे-खालसा नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. या गावातील लोक गुणवंत शिक्षकांचा सन्मान अत्यंत वेगळ्या आणि वैशिष्टपूर्ण रीतीने करतात. घड्याळ, सोन्याची आंगठी, लॅपटॉप, फ्रीज, मोटार सायकल, कार अशा मौल्यवान वस्तू देऊन गौरव करतात. या गावाने ही परंपरा सन 1971 सालापासून म्हणजे 49 वर्षे जपली आहे. आता प्रश्न असा पडतो की कौतुक कोणाचं करायचं ? या गावक-यांचं की शिक्षकांचं ? येथील गावकरी श्रेष्ठ की शिक्षक? यंदा या गोष्टीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

50 वर्षात किती तरी शिक्षक येऊन गेले. कितीतरी गाव कारभारी बदलले. परंतु या परंपरेत खंड पडला नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की शिक्षक खूप चांगलं काम करतात म्हणून ग्रामस्थ त्यांचं भरभरून कौतुक करतात आणि ग्रामस्थ भरभरून कौतुक करतात, म्हणून शिक्षक जीवाचं रान करतात व झोकून देऊन काम करतात.

माझ्या माहितीतील अशा आणखी काही शाळा आणि शिक्षक आहेत की, त्यांच्या चांगल्या कामाची किर्ती दूरवर पसरली आहे. शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची शाळा ही त्यापैकी एक. या शाळेतील श्री. वारे गुरुजींनी ही शाळा अत्यंत वेगळ्या उंचीवर नेवून ठेवली. तसेच या तालुक्यातील कर्डेलवाडीची सकट पती-पत्नीची शाळा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने काम करून राज्यात आदर्श ठरली आहे. महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ञांनी या शाळेला भेट देऊन हा आदर्श उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी प्रयत्न करताहेत. ही शाळा इतर शाळांना पथदर्शक ठरली आहे.

या उलट एखादा शिक्षक नकॊ म्हणुन त्याच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे पालक किंवा ग्रामस्थ यांची संख्याही काही कमी नाही.

माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्याचं भवितव्य माझ्या हातात आहे. या देशाचे उद्याचे नागरिकही तेच आहेत. म्हणजेच उद्याच्या देशाचं भवितव्य माझ्यासमोर बसलं आहे.” याचं भान सर्व शिक्षकांनी ठेवून पुस्तकी शिक्षणाबरोबर चौकटी बाहेर जाऊन काम केलं तर समाजाला योग्य दिशा मिळेल. सुसंस्कृत व सक्षम नागरिक बनवण्याचं महान कार्य करणाऱ्या या शिक्षण महर्षींना तसेच सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि आदरपूर्वक प्रणाम !

पी. टी. शिंदे
रानमळा, राजगुरूनगर
9822283152

( लेखक माजी आदर्श शिक्षक, आदर्श रानमळा गावचे माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी वनसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे. )

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.