पर्यावरण रक्षणासाठी वृक्षसंवर्धनाची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पंढरपूर :
या वर्षीच्या वृक्ष लागवडीचा शुभारंभ पर्यटन, पर्यावरण, राज्य शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमहोत्सव वृक्ष लागवड मोहिमेस शुभेच्छा दिल्या.
वने व पशुसंवर्धन राज्यमंत्री तथा सोलापूर  जिल्‍ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तुळशी वृंदावन, पंढरपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.  सा-या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुमाऊलीच्या पावनभूमीतून सुरु झालेल्या या कार्यक्रमास सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) विवेक खांडेकर, सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सोलापूरचे जिल्‍हा  पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सामाजिक वनीकरणाचे  विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, उपविभागीय अधिकारी उदय भोसले, सहायक वनसंरक्षक आय. एच. शेख, के. एस. आहीर, व्ही. एन. पवळे तसेच वन विभाग, महसूल व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या घडीस पर्यावरणास सर्वोच्च महत्त्व असल्याचे व त्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन वृक्ष संवर्धन करण्याची गरज असल्याचे पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी नमूद केले. वृक्ष लागवडीमुळेच प्रदूषण नियंत्रण होऊन पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. प्रत्येक झाड हे ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असतो व आपण जेवढी जास्त झाडे लावू तेवढा आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळेल, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे वृक्ष हे जल व मृद संधारणाचे महत्‍त्वाचे साधन असल्याने श्वसनासाठी शुध्द हवा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी व खाण्यासाठी सकस अन्नाची हमी वृक्ष लागवडीतूनच मिळणार असल्याचे ते म्हणाले. प्रदूषण नियंत्रणामध्ये वृक्षांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थी, शेतकरी, सर्व नागरीक व शासकीय यंत्रणा या सर्वांनी वृक्ष लागवडीमध्ये मोठया प्रमाणात सहभागी होऊन या वर्षीच्या पावसाळयामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी व शासनाची ही वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्‍यांनी केले.
राज्यात दरवर्षी दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर या काळात वनविभागामार्फत वनमहोत्सव कार्यक्रम राबविण्यात येतो. या वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अखंडपणे पुढेही चालू राहावा यासाठी वनविभागामार्फत वनक्षेत्रावर व सामाजिक वनीकरण विभागामार्फत खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा क्षेत्रात, सामुहिक पडि‍क क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठया प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा यासाठी शासनाने सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना दि. १५ जून ते ३० सप्टेंबर २०२० या वनमहोत्सवाच्या काळात सवलतीच्या दराने रोपे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्र.साववि-२०२०/प्र.क्र.४३/फ-११, दि. १५/०६/२०२० अन्वये घेतला आहे.

त्यानुसार राज्यात सन २०२० च्या पावसाळयात दि. १५ जून ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांना ९ महिन्यांचे रोप ( लहान पिशवीतील रोप ) रुपये ८/- तर १८ महिन्यांचे रोप ( मोठया पिशवीतील रोप ) रुपये ४०/- या सवलतीच्या दराने शासनातर्फे पुरविण्यात येईल. ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे, पण त्यांच्याकडे रोपनिर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नाही अशा यंत्रणांना या वनमहोत्सव काळात रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी त्यांनी लागणा-या रोपांची आगाऊ मागणी लगतचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण यांचेकडे मागणीपत्राद्वारे करावी.
पालकमंत्री दत्‍तात्रय भरणे यांनी वन विभागाने साकारलेल्या पंढरपूर येथील तुळशी वृंदावनाची पाहणी केली.  तुळशी वृंदावनामध्ये केलेल्या विविध कामांबद्दल समाधान व्यक्त करून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.
पर्यावरण संतुलनामध्ये वृक्षांचे अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये समाजातील सर्व घटकांनी मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करून सहभागी व्हावे, असे आवाहन त्‍यांनी केले. या दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक नियम व अटींचे पालन करून करण्यात आले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.