अध्यात्मिक

भाविक वारक-यांच्या नेत्रांच्या कडातुन अश्रु ; घंटानाद, पुष्पवृष्टी, हरिनामाचा घोष ● मंदिरात माधव महाराज नामदास यांचे कीर्तन…

भाविक वारक-यांच्या नेत्रांच्या कडातुन आश्रु ; घंटानाद, पुष्पवृष्टी, हरिनामाचा घोष
● मंदिरात माधव महाराज नामदास यांचे कीर्तन…

महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : रामकृष्णहरी…, ज्ञानोबा माउलीचा नामजय घोष…, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल गजर… टाळ, मृदंग, वीणेचा त्रिनाद … आणि टाळ्यांचा कडकडाट … हभप. माधव महाराज नामदास यांचे हृदयस्पर्शी कीर्तन सेवेत संत महिमा… हरिनाम जयघोष करीत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधीवर तुळशी फुलांसह विविधरंगी फुलांच्या पाकळ्यांची भाविकांनी केलेली पुष्पवृष्टी… मंदिरात परंपरेने घंटानाद होताच हृदयस्पर्शी वातावरणात माउलींचा ७२६ वा संजीवन समाधी दिन सोहळा अलंकापुरीत गुरुवारी (दि.२) नामगजरात साजरा झाला.

या सोहळ्यास पुणे जिल्हा न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख, नामदेव महाराज यांचे वंशज माधव महाराज नामदास, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, पंढरपूर देवस्थान समिती सदस्या अॅड. माधवी निगडे, खेडच्या तहसिलदार वैशाली वाघमारे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, माजी उपाध्यक्ष प्रशांत कु-हाडे, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय घुंडरे, सचिन गिलबिले, सागर भोसले, सचिव अजित वडगावकर, माऊली गुळुंजकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक, मानकरी योगेश आरु, योगिराज कुऱ्हाडे, स्वप्नील कुऱ्हाडे, आळंदी नगरपरिषदेचे आजी, माजी नगरसेवक पदाधिकारी, महाराज, फडकरी, दिंडीकरी, मानकरी उपस्थित होते.

मंदिरातील विनामंडपात परंपरेने संत नामदेवराय यांचे १६ वे वंशज माधव महाराज नामदास यांची माऊलीचे जीवन चरित्रावर आधारित हृदयस्पर्शी कीर्तन सेवा झाली. दरम्यान विनामंडपासमोर श्री गुरु हैबतरावबाबा आरफळकर याचे वतीने पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे नातू ऋषिकेश महाराज आरफळकर यांची कीर्तन सेवा झाली. तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात श्रींचे संजीवन समाधी प्रसंगावर आधारित विविध ठिकाणी कीर्तन सेवा सुश्राव्य वाणीतून राज्यातील नामवंत कीर्तनकार महाराजांनी रुजू केली. माउली मंदिरातील विनामंडपात परंपरेने संत नामदेवराय यांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास यांची, विना मंडपासमोर श्री गुरु हैबतरावबाबा आरफळकर यांचे वतीने ऋषिकेष राजेंद्र आरफळकर यांची कीर्तनसेवा तसेच आळंदी परिसरात ठिक ठिकाणी संत ज्ञानेश्वरमहाराज यांचे जीवन कार्यावर आधारित कीर्तन सेवा तसेच समाधी प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा सुश्राव्य वाणीतून नामवंत महाराजांनी सादर केली.

● ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ! उद्धराया आले दीनजना !!
संत नामदेव महाराज यांचे अभंगावर आधारित वंशज माधव महाराज नामदास यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या हृदयस्पर्शी वाणीतून कीर्तन सेवा केली. माऊलींचे संजीवन समाधी सोहळ्यात कीर्तन करीत असताना महाराजांचे डोळ्यांतून अनेक वेळा आश्रुंचा बांध फुटला. यावेळी अनेक भाविकांच्या नेत्रांचे कडा देखील पान्हवल्या. माऊलींचे समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तनात भक्त भारावले. यावेळी नामदास महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र अनेक संतांच्या संत वचनाचे दाखले प्रमाण देत सांगत कीर्तन सेवा रुजू केली. आळंदीत श्रीचे संजीवन समाधी प्रसंगाचे वर्णन आणि जीवन चरित्र श्रवण करताना अनेक नागरिक, वारकरी, भाविकांच्या डोळ्याच्या कडाही पान्हावल्या आणि श्रीचे संजीवन समाधी प्रसंगाच्या कल्पनेने उपस्थित भाविकही गहिवरुन गेले. माधव महाराज नामदास यांचे हृदयस्पर्शी कीर्तन सेवेत भक्तीचैतन्यमयी वातावरणात श्रीचे संजीवन समाधी सोहळा प्रसंगावर कीर्तन झाले.

माउलीचे मंदिरात श्रीचे संजीवन समाधी दिनास विविध धार्मिक कार्यक्रमांनी भल्या पहाटेच सुरुवात झाली. पहाटे पवमान अभिषेक, दुधारती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते प्रथा परंपरेप्रमाणे झाली. याप्रसंगी विश्वस्त अॅड विकास ढगे पाटील, डॉ. अभय टिळक, नामदास महाराज परिवार उपस्थित होते. यावर्षीही महापूजा झाल्या नाहीत.

माधव महाराज नामदास यांची किर्तनसेवा

संत नामदेवराय यांचे वतीने नामदास परिवारातर्फे महापूजा परंपरेने यावर्षीही कोरोना प्रतिबंधक नियम लागू असल्याने रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरात भाविकांच्या देखील महापूजा बंद ठेवण्यात आल्या. केवळ दर्शन कमी वेळेत जास्त भाविक कसे घेतील यासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले होते. कीर्तन सेवा रुजू करून हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिरात हरीनाम गजरात प्रदक्षिणेस प्रवेश झाला. तत्पूर्वी मंदिरात नामदेव महाराज यांचे वंशज माधव नामदास महाराज यांचे माउलीच्या संजीवन समाधी प्रसंगावर आधारित कीर्तनसेवेत हृदयस्पर्शी वाणीतून समाधी प्रसंगात माउलीचे जीवनकार्य आणि सोहळा भाविकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि भाविकांच्या नेत्रांचे कडा ओल्या झाल्या.

गाभा-यात संत नामदेवराय पादुकासह श्रीची पूजा, आरती, श्रींचे संजीवन समाधी समीप नामदेवरायांचे वैभवी पादुकांची पूजा झाली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, माउली ज्ञानोबा, माउली, ज्ञानोबा-तुकाराम असा नामजयघोष होताच घंटानाद करण्यात आला. फुलांची मुक्त उधळण, तुळशी पत्रे मंजी-याचा श्रीचे संजीवन समाधीवर पुष्पवृष्टीत भाविकांनी वर्षाव केला. कीर्तनसेवा संपताच श्रीची आरती झाली, दरम्यान गाभा-यात आरती, घंटानादानंतर श्री ज्ञनेश्वर महाराज संस्थान कमेटीच्या वतीने प्रमुख मानकरी, पदाधिकारी, सेवक यांना नारळ प्रसाद देण्यात आला. श्रीना महानैवेध्यानंतर सोपानकाका देहूकर यांचे वतीने कीर्तन सेवा उत्साहात झाली. हैबतरावबाबा यांचे तर्फे हरीजागर सेवा झाली. आळंदी पंचक्रोशीत सोहळ्या निमित्त कीर्तन सेवा, महाप्रसाद वाटप हरिनाम गजरात झाला.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पूजा अकरा ब्रम्ह्वृंदांच्या वेद मंत्र जयघोषात पूजा बांधली. श्रींचे पहाटपूजेचे वेदमंत्र जयघोषात पठन पौरोहित्य मंडळाने केले. श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यात पहाट पूजेत पौरोहित्य प्रसाद जोशी, निखिल प्रसादे, यशोदीप जोशी, आनंद जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, मंदार जोशी, श्रीरंग तुर्की, संदीप कुलकर्णी, अवदूत गांधी, विजय कुलकर्णी यांनी वेद मंत्र जय घोष करीत रूद्राभिषेक व पवमान अभिषेक प्रथा प्रारंपरेचे पालन करीत केला.

माऊली मंदिरावर रोषणाई व सजावट

मंदिरात आकर्षण विविध रंगी फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधले. माऊलीना लक्षवेधी पोशाख व मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली. विद्युत रोषणाई सेवा मोठ्या प्रमाणात झाल्याने मंदिराचे अंतरंग व बाह्यरंग लक्षवेधी रोषणाईने उजळून निघाले. यावर्षीची पुष्पसजावट व विद्युत रोषणाई सेवा लक्षवेधी ठरली. रंगावलीने यात आणखी भर घातली. स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांचे मार्गदर्शनात मंदिरात विशेष स्वच्छता सेवा देण्यात आली. यासाठी सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

● आळंदीत कार्तिकी यात्रा चोख व्यवस्थेने समाधानी : नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर
यावर्षी आळंदी कार्तिकी यात्रेत सुसंवादास प्राधान्य दिल्याने यात्रेचे नियोजन ठरल्याप्रमाणे प्रशासनाने कामकाज केले. यातून भाविकांसह नागरिकांना सुविधा देता आल्या. यात्रा काळात नागरी सुविधांबाबत भाविकांची तसेच नागरिकांची सोय केली. आपण यामुळे समाधानी असल्याचे आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. यासाठी आळंदी देवस्थान तसेच जिल्हा महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

आळंदी कार्तिकी यात्रा काळात पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांत विक्रांत चव्हाण , आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, अॅड. विकास ढगे, व्यवस्थापक माउली वीर, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, मंडलाधिकारी स्मिता जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदींनी केलेल्या नियोजना प्रमाणे कामकाजात कोरोना काळात दक्षता घेत परिश्रम घेतले. यामुळे आळंदीतील कोरोना रुग्ण संख्याही घटली. यामुळे यात्रेचे नियोजन करण्यास विशेष सहकार्य झाले.

सार्थ ज्ञानेश्वरी चे हिंदीतून प्रकाशन

डॉ. ह.भ.प. तुकाराम बापूसाहेब गरुड ( ठाकूरबुवा गरुड ) यांचे विशेष प्रयत्नातून सार्थ शुद्ध ज्ञानेश्वरी आता हिंदीत प्रकाशित करण्यात आली आहे. या हिन्दीतील श्री सार्थ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. अभय टिळक यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी चैतन्य महाराज कबीरबुवा, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, तुकाराम बापूसाहेब गरुड ( ठाकूरबुवा ) उपस्थित होते. यावेळी डॉ. अभय टिळक यांनी उपक्रमाचे कौतुक केले. संत साहित्य हिंदीतही उपलब्ध होत असून या सोहळ्यात प्रकाशित आहे. याचा विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी सूत्रसंचलन केले. 

तुळसी रोपे देऊन वारकरी भाविकांचा सत्कार

आळंदी नगरपरिषदेच्या वतीने भाविकांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेच्या वतीने आळंदी कार्तिकी यात्रेत माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
या अभियान अंतर्गत आळंदीत आलेल्या वारकरी, भाविकांना नगरपरिषदेकडून अभियानातील पंचतत्व संरक्षणाची माहिती देवून स्वच्छतेसह हरित शपथ देण्यात आली. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तुळशी रोपांचे वाटप करून हरित दिंडी या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी केले आहे.

अलंकापुरीस भेट देणाऱ्या भाविकांनी उत्साहाने या अभियानात सहभाग घेवून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत नगरपरिषदेच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावर्षी भाविकांच्या आरोग्याची तसेच सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली. याअंतर्गत भक्ति सोपान पुलाची तात्काळ दुरूस्ती, दर्शनबारी रस्ता करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

उद्या शुक्रवारी (दि.३) मंदिरात श्रींना पवमान पूजा अभिषेक, महानैवेद्य, दुधारती, धुपारती आळंदी देवस्थानचे वतीने होणार आहे. परंपरेने संतोष महाराज मोजे यांचे वतीने कीर्तनसेवा विनामंडपात होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.